मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात, एकाचा मृत्यू, 9 जखमी
एबीपी माझा वेब टीम | 12 Jun 2016 11:55 AM (IST)
रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर आणखी एका अपघाताची घटना समोर आली आहे. तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एक्स्प्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाताना तीन कारची एकमेकांना धडक बसली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पनवेल-खोपोली दरम्यान हा अपघात घडला आहे. दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाढत्या अपघातांचं प्रमाण लक्षात घेता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांमध्ये तब्बल 579 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि महामार्ग पोलिसांकडून ही कारवाई सुरु आहे. गेल्याच रविवारी एक्स्प्रेस वे वर बस-कारच्या झालेल्या अपघातात 17 प्रवाशांना जीव गमवावा लागला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. गेल्या काही दिवसांत वाढलेल्या अपघातांच्या प्रमाणामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याची टीका होत आहे. त्यामुळे ही कारवाई सुरु आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 286 तर महामार्ग पोलिसांनी एकूण 293 दोषी वाहनचालकांवर कारवाई केली आहे. दोषी वाहनचालकांकडून पावणेतीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 22 वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.