पुणे : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 14 मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे पुण्यात परीक्षार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. त्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. पुण्यातील नवी पेठे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 


पुण्यातील नवी पेठ येथे संतप्त एमपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनाला सुरुवात केली. शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केलं. विद्यार्थ्यांनी नवी पेठेतील दोन्ही रस्ते रोखून धरले होते. पोलिसांकडूनही विद्यार्थ्यांची धरपकड सुरु आहे. परीक्षेला अवघे तीन दिवस बाकी असताना अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थी नाराज झाले. त्यांनी रस्त्यावर ठिय्या सुरु केला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी परीक्षार्थींची धरपकड सुरु केली. 


रद्द केलेली पूर्वपरीक्षा घेण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरु : सूत्र 


कोरोनामुळं एमपीएससीची 14 मार्च रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे.  परीक्षा पुढे ढकलण्याच्या MPSC च्या निर्णयामुळे सरकारविरोधात रोष निर्माण झालं आहे. पुण्यातील नवी पेठेत शेकडो विद्यार्थ्यांचा रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलं आहे. MPSC ने सरकारशी चर्चा न करता परस्पर निर्णय घेतल्याचे समोर आलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर रद्द केलेली पूर्वपरीक्षा घेण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत.


एमपीएससीची परीक्षी पुढे ढकलल्याने राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. तर रद्द केलेली पूर्व परीक्षा पन्हा घेण्याची मागणी सर्वस्तरातून केली जात आहे.


तातडीने फेरविचार झालाच पाहीजे : सत्यजीत तांबे


एमपीएससीची परीक्षा ढकलण्याच्या निर्णयाचा जाहीर निषेध करतो, या निर्णयाचा तातडीने फेरविचार झालाच पाहीजे अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करत म्हटलं आहे की, “एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो.  करोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे ?  ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे.”.


सरकार तुमचंच आहे. कुणाची वाट पाहत आहात? भाजयुमोच्या विक्रांत पाटील यांची सत्यजित तांबेंवर टीका


“युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी परीक्षेचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. सरकार तुमचंच आहे. कुणाची वाट पाहत आहात? विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्या”, असं म्हणत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे


एमपीएससीची परीक्षा झालीच पाहिजे : रोहित पवार


कोरोनाचे नियम पाळून एमपीएससीची परीक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करुन म्हटलं आहे की, "कोरोनामुळे यापुढे कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढे जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच #MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपण याकडे लक्ष द्यावं, ही विनंती!"


विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या पाहिजे : भाजप नेते गोपीचंद पडळकर


विद्यार्थ्यांच्या परीक्षा या झाल्या पाहिजे अशी मागणी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पोलिसांनी आंदोलकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे. हे कदापी आम्ही खपवून घेणार नाही. जोपर्यंत परीक्षा तुम्ही पुन्हा घेत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता सोडणार नाही.


एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय चुकीचा : पंकजा मुंडे


एमपीएससीची परीक्षा ढकलण्याचा निर्णय चुकीचा असल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत दिली आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करुन म्हटलं आहे की, “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत #MPSC रविवार दिनांक 14 मार्च, 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 ही अचानक पुढे ढकलण्यात आली आहे, हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, त्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान होणार असल्याने त्याला नापसंती व्यक्त करत आहे.”


अचानक परीक्षा पुढे ढकलणे योग्य नाही : पृथ्वीराज चव्हाण


अचानक परीक्षा पुढे ढकलणे योग्य नसल्याचं मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. परीक्षेबाबत अनिश्चितता तयार करणे योग्य नसून, सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी देखील केली चव्हाण यांनी केली आहे.