पिंपरी चिंचवड : प्रेयसीसोबत लग्न करता यावं यासाठी पतीने आठ महिन्याच्या मुलासह पत्नीला संपवल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. चार चाकीतून निघालेल्या कुटुंबाला अडवून गळा दाबून हत्या करण्यात आली.


पती दत्ता भोंडवेने ही हत्या घडवून आणल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. विशेष म्हणजे जेव्हा कुटुंबावर हल्ला झाला, तेव्हा दत्ता भोंडवे या हल्ल्यातून सुखरुप बचावला होता. मात्र नंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली.

दत्ताचे एका महिलेशी प्रेम संबंध होते. पत्नीचा काटा काढल्यानंतरच तुझ्याशी लग्न करता येईल, असं दत्ता प्रेयसीला म्हणाला. मग या दोघांनी प्रत्येकी पन्नास-पन्नास हजाराची सुपारी देण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे दोघांनी जांभे-नेरे रस्त्यावर गाडी अडवल्याचं दाखवून अश्विनी आणि मुलगा अनुजची गळा दाबून हत्या केली.

हत्या केल्यानंतर गाडीत असलेले पन्नास लाख चोरुन नेल्याचा कांगावा केला. याप्रकरणी दत्ता, प्रेयसी आणि दोन्ही हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.