Pune Dagadusheth Temple Mock Drill:  पुणे शहरात दहशतवादी हल्ल्यांसारख्या गंभीर घटनांचा सामना करण्यासाठी पोलिसांची तयारी कितपत आहे, हे तपासण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी शुक्रवारी विविध ठिकाणी मॉक ड्रिल्स (सराव चाचण्या) केल्या. विमान अपहरणापासून गर्दीच्या रस्त्यांवरील स्फोटांपर्यंतच्या परिस्थितींसाठी या सराव चाचण्या घेण्यात आल्या. शहरातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात (Dagdusheth Ganpati Temple) शनिवारी पहाटे दहशतवादी हल्ल्याचा डमी सीन तयार करून “मॉक ड्रिल” करण्यात आलं. पुणे पोलिस, केंद्रीय सुरक्षा यंत्रणा, बॉम्ब स्क्वॉड, तसेच आपत्कालीन प्रतिसाद पथक यांच्या संयुक्त सहकार्याने ही सराव चाचणी राबवण्यात आली.

Continues below advertisement

दगडूशेठ मंदिरात शनिवारी मॉक ड्रिल 

ही सराव चाचणी शनिवारी मध्यरात्री 1 वाजता घेण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रिलमध्ये दहशतवादी मंदिर परिसरात शिरल्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस आणि इतर आपत्कालीन पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. यावेळी मंदिर परिसरात खऱ्या घटनेप्रमाणे परिस्थिती निर्माण करण्यात आली होती, ज्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सज्जता तपासली गेली.

या आधी शुक्रवारी दुपारीही शहरातील काही भागांमध्ये अशाच प्रकारचे ड्रिल घेण्यात आले होते. दुपारी 2 वाजता फर्ग्युसन रस्त्यावर आणि 2.30 वाजता महात्मा गांधी रस्त्यावर डमी स्फोट घडवण्यात आले. या दोन्ही ठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती पोलिसांनी काही मिनिटांत नियंत्रणात आणली. दोन्ही स्फोट हे पूर्णपणे “डमी” असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली असून, नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Continues below advertisement

अफवांवर विश्वास ठेवू नये: पोलिसांचे आवाहन 

तसेच, शुक्रवारीच विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या R & DE (Research & Development Establishment) परिसरातही दहशतवादी हल्ल्याची डमी परिस्थिती तयार करून आणखी एक सराव चाचणी करण्यात आली. या सर्व ड्रिल्सचा उद्देश म्हणजे, शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिस, अग्निशमन दल, आणि इतर आपत्कालीन यंत्रणा कितपत तत्परतेने आणि समन्वयाने काम करतात, हे तपासणे.सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन स्थिती ओढावल्यास काय करायचे यासाठी केलेले हे एक मॉक ड्रिल आहे तरी नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे.