Raj Thackeray: राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. बैठका, दौरे, सभा, पक्षप्रवेश आणि जागावाटपाच्या चर्चा अशा घडामोडींना वेग आला आहे. अशातच लोकसभा निवडणुकीला एकही उमेदवार न देणाऱ्या मनसेने देखील विधानसभेला किती जागा लढवणार याबाबतची चाचपणी सुरू केली आहे. अशातच पुणे शहरासह जिल्ह्यातील 21 जागा लढवणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


फक्त शहरातीलच नाही तर पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व 21 जागा आपण लढवणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. दोन दिवस झालेल्या पुणे दौऱ्यावेळी ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली, त्यावेळी त्यांनी शहरातील ८ व जिल्ह्यातील अन्य विधानसभा (Vidhan Sabha) मतदारसंघांची पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. 


नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे  (Raj Thackeray) यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होती. मात्र आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढणार असल्याचं राज ठाकरे  (Raj Thackeray) यांनी जाहीर केलं आहे. त्यानंतर आता मनसेकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची तयारी सुरू केली आहे. राज ठाकरे काही भागामध्ये दौरे करत आहेत, बैठका घेत आहेत, त्यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागा असा आदेश दिला होता. पुण्यातील दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी यासंदर्भात कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कसबा, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कॅन्टोन्मेट हे 6 आणि हडपसर, खडकवासला हे दोन असे 8 विधानसभा मतदारसंघाबाबत राज ठाकरेंनी स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याची माहिती आहे. राज ठाकरेंनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती जाणून घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे मतदारसंघ आपण लढवणार आहोत, कामाला लागा अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत. नवीन शाखा, कार्यकर्त्यांच्या बैठका, जबाबदारी सोपवणे अशा सूचना त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.


आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे ग्रामीणसाठी ठाकरेंनी  (Raj Thackeray) अविनाश जाधव यांची नियुक्ती केली होती. तर पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांकडे राज्यातील काही जिल्ह्यांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. बाबू वागसकर- सोलापूर, परभणी- ॲड. गणेश सातपुते, हिंगोली- हेमंत संभूस, बुलढाणा- साईनाथ बाबर यांचा समावेश होता. या पदाधिकाऱ्यांनी अहवाल राज ठाकरेंकडे  (Raj Thackeray)  सुपुर्द केले असल्याची माहिती समोर आली आहे. यासंबधीचे वृत्त लोकमत या वृत्तसंस्थेने दिले आहे.