पुणे : खड्ड्यांविरोधात अनोख्या आंदोलनांची मालिका मनसेने पुण्यातही सुरु ठेवली आहे. मनसेने खड्डयांविरोधात आणखी एक अनोखं आंदोलन पुण्याच्या मावळमध्ये केलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी थेट झोपा काढत आपला निषेध नोंदवला आहे.
मावळातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या खड्ड्यांपासून मुक्तता मिळावी, यासाठी आज मनसे कार्यकर्ते बांधकाम विभाग कार्यलयात निवेदन देण्यासाठी गेले. मात्र एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हता. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी झोपा काढत आंदोलन सुरु केलं.
मनसे कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच धांदल उडाली. अधिकाऱ्यांना माहिती मिळताच तातडीने त्यांनी कार्यालयात धाव घेतली.
खड्ड्यांविरोधात मनसेची अनोखी आंदोलनं
मनसेने राज्यातील खड्ड्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत ठिकठिकाणी अनोखी आंदोलनं केली आहेत. पावसामुळे राज्यभरात रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य झालं असून वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
खड्ड्यांप्रकरणी मनसे आक्रमक, तुर्भेतलं PWD चं ऑफिस फोडलं!
सायन-पनवेल महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्यामुळे मनसेनं तुर्भे इथल्या पीडब्लूडी कार्यालयाची 16 जुलै रोजी तोडफोड केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या तोडफोडीचं समर्थन केले होतं.
पनवेलपासून सायनपर्यंत रस्त्यावर भले मोठे खड़्डे पडले आहेत. याचा परिणाम वाहनांचा वेग मंदावण्यात होतो आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं खड्ड्यांच्या प्रमाणात वाढच झाली आहे. वाहनचालकांना त्यामुळं मोठी करसत करावी लागते. खारघर आणि बेलापूर दरम्यानच्या दोन्ही मार्गिकांवर वाहतूक कोंडी होते. 4 ते 5 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. खारघर, सीवूड्स, नेरुळमधल्या अंतर्गत मार्गावरचे रस्तेही खड्ड्यांमुळे जाम होतात.
खड्ड्यांवरुन मनसे आक्रमक, मंत्रालयासमोरील रस्ता खोदला
रस्त्यांच्या दुर्दशेकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सोमवारी 16 जुलै रोजी मध्यरात्री मनसेने थेट मंत्रालयाबाहेरील रस्ता खोदला. मनसेने मंत्रालयाबाहेरील पेव्हर ब्लॉक टिकावाच्या सहाय्यानं उखडले.
मुंबईसह महाराष्ट्रात पडलेल्या खड्ड्यांचा मनसेकडून निषेध करण्यात येत आहे. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर हे आंदोलन करत मनसेने सरकारचा निषेध केला. या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होतं. सायन-पनवेल महामार्गाची रस्त्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे. यासाठीच मनसेकडून हे आंदोलन करण्यात आले.
खड्ड्यांविरोधात आंदोलन, मनसेची महापौर, आयुक्तांना प्रतिकात्मक श्रद्धांजली
मनसेने मुंबईतल्या खड्ड्यांविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आयुक्त अजॉय मेहता यांना प्रतिकात्मक श्रद्धांजली देत रविवारी 22 जुलै रोजी मनसेने मुंबईतल्या खड्ड्यांविरोधात आंदोलन केलं. साकीनाका मेट्रो स्टेशन जवळच्या परिसरात खड्ड्यांनी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. याच ठिकाणी मनसेने आंदोलन करत महापौर आणि आयुक्त यांच्या फोटोला हार वाहिले, तसंच त्यांनी न केलेल्या कामाला श्रद्धांजली म्हणून दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजलीही वाहिली. येत्या आठ दिवसांत मेट्रो पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यांवरचे खड्डे भरले गेले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा आणि जबाबदार लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना त्याच खड्ड्यात उभं करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.
खड्ड्यांना मंत्री, खासदार आमदारांची नावं; पालघरमध्ये मनसेचं आंदोलन
पालघरमधील खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाचं लक्ष वेधण्यासाठी मनसेने 20 जुलै रोजी अनोखं नामकरण आंदोलन केलं. या नामकरण आंदोलनामधे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णु सावरा, खासदार कपिल पाटील, आमदार शांताराम मोरे यांची नावं खड्डेमय रस्त्यांना देण्यात आली.
वाडा तालुक्यातील बहुतांशी रस्ते खड्ड्यात गेले असून त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. मात्र प्रशासन तसेच तालुक्यातील मंत्री, आमदार, खासदार याची दखल घेत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील रस्त्यांवरील खड्यांना मंत्री, खासदार आणि आमदारांची नावं देण्याचं अनोखं आंदोलन आज वाडा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलं.
सरकारी कार्यालयात झोपा काढत मनसेचं खड्ड्यांविरोधात अनोखं आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jul 2018 05:30 PM (IST)
मनसेने खड्डयांविरोधात आणखी एक अनोखं आंदोलन पुण्याच्या मावळमध्ये केलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी थेट झोपा काढत आपला निषेध नोंदवला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -