Pune MHADA Lottery : पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर (Pune Solapur Kolhapur MHADA Lottery) जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 5 हजार घरांची सोडत पार पडली. व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली. एकून 5211 घरांसाठी सुमारे 71 हजार 742 अर्ज सादर झाले होते.


या सोडतीद्वारे 5211 अर्जदार विजेते ठरले असून आता पुढे त्यांची पात्रता निश्चिती पूर्ण करून त्यांना घरांचा ताबा देण्यात येणार आहे. सागर खैरनार हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या सोडतीतील पहिले विजेते ठरले आहेत.  या सोडतीत पुणे,पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 5211 घरांचा समावेश आहे. यात 20 टक्के योजनेतील 2088, म्हाडा पंतप्रधान आवास योजनेतील 170, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य गटातील 2675 आणि म्हाडाच्या विविध योजनेतील 279 घरांचा समावेश आहे. 


यात प्रतिक्षायादीचा देखील समावेश करण्यात आला आहे. ज्या नागरीकांना सोडतीत लागलेल्या घराबाबत शंका असल्यास ते घर नाकारतात त्यांनी नकार दिल्यावर प्राधान्यानुसार  प्रतिक्षायादीतील नागरीकाला घर दिलं जातं. तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्षा यादी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या यादीत भ्रष्टाचार चालतो असं त्याचं मात होतं. मात्र पुणे म्हाडाच्या सोडतीत प्रतिक्षा यादीचा समावेश करण्यात आला आहे.


उत्पन्न मर्यादेत राज्य सरकारकडून बदलामुळे उशीर
ही सोडत 29 जुलैला काढण्यात येणार होती. मात्र म्हाडाच्या सोडतीच्या उत्पन्न मर्यादेत राज्य सरकारकडून बदल करण्यात आला. त्यामुळे नवीन उत्पन्न मर्यादेसह अर्ज भरून घेणे गरजेचे झाल्याने संगणकीय प्रणालीत तसे बदल करून पुणे मंडळाने जुलैमध्ये अर्जस्वीकृती सुरू केली. या पार्श्वभूमीवर साहजिकच सोडत पूर्व प्रक्रियेला मुदतवाढ देऊन सोडत 29 जुलैऐवजी 18 ऑगस्टला निश्चित करण्यात आली होती.


लॉटरीला चांगला प्रतिसाद 
9 जून, 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली होती. 9 जुलै, 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार होती. या लॉटरीसाठी 80 हजारांहून अधिक अर्ज आले होते. या लॉटरीला भरभरुन प्रतिसाद मिळाला असल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलं आहे.