Mhada paper leak : म्हाडा पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. म्हाडा पेपरफुटीप्रकरणी तपास करत असताना पुणे सायबर पोलिसांना टीईटी परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आरोप घर झडतीमध्ये टीईटी परीक्षे संदर्भातील कागदपत्रे सापडली आहेत. त्याशिवाय परीक्षार्थींची काही ओळखपत्रेही सापडली आहेत. त्यामुळे आता म्हाडा पेपरफुटी प्रकरण हे घोटाळ्याचे हिमनगाचे टोक ठरणार असल्याची चर्चा आहे. 


म्हाडा पेपरफुटीनंतर पुणे सायबर पोलिसांनी आपला तपास वेगाने सुरू केला आहे. टीईटी परीक्षेत डमी बसवण्याचा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोपी प्रीतेश देशमुखच्या पिंपरी-चिंचवड येथील घरात छापा टाकला असता पोलिसांना टीईटी परीक्षेची ओळख पत्र मिळाले. त्यामुळे शिक्षक भरती परीक्षेचा पेपर देखील त्यांनी फोडला की काय अशी शंका निर्माण झाली आहे. पुणे पोलिसांची काही पथके वेगवेगळ्या ठिकाणी गेली असून त्या ठिकाणी तपास सुरू असल्याची माहिती आहे. 


म्हाडा भरतीचा पेपर फुटणार असल्याची कुणकुण आधीच लागली होती. त्यामुळे 10 डिसेंबर रोजी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून पेपर होण्यापूर्वीच काही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांना त्यांच्याकडे म्हाडाचे पेपर देखील सापडले. 


म्हाडा पेपरफुटीसाठी खास कोडवर्ड 


 हा पेपर फोडण्यासाठी आरोपींनी कोडवर्ड ठरवला होता. या कोड वर्डच्या माध्यमातूनच ते संभाषण करायचे. घर आणि वस्तू हा कोड वर्ड होता. घर म्हणजे महाडा आणि वस्तू म्हणजे पेपर असा त्या शब्दांचा वापर होता. संभाषण करताना ते 'घरातील वस्तू कधी मिळणार' या शब्दांचा वापर करीत होते. तपासादरम्यान पोलिसांना जे पुरावे मिळाले त्यातून ही धक्कादायक माहिती पुढे आली.


त्यासोबतच ज्या दिवशी पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणी कारवाई केली त्यादिवशी आरोपींच्या संपर्कात असणाऱ्या, त्यांना फोन करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करणार आहे. त्यादिवशी आरोपींच्या मोबाईलवर रात्री उशिरापर्यंत अनेकांचे फोन येत होते. त्यामुळे हे फोन नेमके कोणाचे आहेत, त्यातील कुणी आरोपी आहेत का याचा तपास करण्यासाठी त्यांच्याकडे तपास केला जाणार आहे. फोन करणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांचा देखील समावेश असू शकतो असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना बोलावून आरोपी अशाप्रकारे पेपर फोडणार होते, त्यासाठी किती रुपयांचा व्यवहार ठरला होता, यामध्ये आणखी कोणी सहभागी आहेत का त्याच्या तपासासाठी संबंधितांकडे चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.