Pune Metro News: पीएमआरडीए (PMRDA) आणि ‘महामेट्रो’कडून सुमारे 43 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचे नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर हा 23 किलोमीटर लांबीच्या मार्गासह एकूण 66 किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे शहरात निर्माण होणार आहे. त्यामध्ये खडकवासला ते स्वारगेट, हडसपर ते सासवड आणि स्वारगेट ते रेसकोर्स या मार्गांचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेटया मेट्रो प्रकल्पाचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे तर हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. त्यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला तर खडकवासला ते खराडी हा 28 किलोमीटरचा मार्ग होणार आहे. विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर, पुलगेट, हडपसर आणि लोणीकाळभोर तर एक फाटा सासवड रोडवर असा आहे. महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पुलगेट-हडपसर फाटा ते खराडी असा आहे.
मेट्रोत साजरा करता येणार वाढदिवस
पुणे मेट्रोतील करामती अनेकदा व्हायरल झाल्या आहेत. काही दिवसांपुर्वी याच मेट्रोत पुस्तक प्रकाशनसुद्धा करण्यात आलं होतं. याच सगळ्या करामती आणि पुणे मेट्रोचा होणार उपयोग पाहून पुणे मेट्रोने आता नवी संकल्पना समोर आणली आहे. पुणे मेट्रोत आता नागरीकांना वेगळेवेगळ्या प्रकारचे सोहळे साजरे करता येणार आहे. त्यात वाढदिवस, वर्धापनदिन किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करता येणार आहे.
अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, पुणे मेट्रो रेल्वेने खाजगी उत्सवांसाठी एक डबा देण्याची घोषणा केली आहे आणि ज्यांना वाढदिवस, वर्धापनदिन इत्यादी कार्यक्रम साजरे करायचे आहेत त्यांच्यासाठी डब्यात एक फेरी (येणे-येणे) दिली जाईल. हा उपक्रम खुला असेल. दोन्ही मार्गांवर - लाईन 1 (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते फुगेवाडी) आणि लाईन 2 (गरवारे कॉलेज ते वनाज) सुरु असेल. मात्र या सगळ्यांमुळे नियमित प्रवाशांना प्रवासासाठी कोणताही त्रास होणार नाही याची काळजी पुणे मेट्रो प्रशासनाकडून घेतली जाणार आहे.