पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात मेस्मा कायदा लागू करण्यात आला आहे. अशाप्रकारे मेस्मा लागू झालेले ससून हे पहिलेच रुग्णालय ठरले आहे. मेस्मा कायदा लागू केल्यानंतर आधी आंदोलन केलेल्या परिचारिकांनी ही शासनाची मुस्कटदाबी असल्याचा आरोप केला आहे.

मेस्मा लागू झाल्यामुळे आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिने अत्यावश्यक सेवा बंद ठेवता येणार नाहीत. काही दिवसांपूर्वी ससूनमधील परिचारिकांनी अन्यायकारक बदली विरोधात संप पुकारला होता. त्या संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

परिचरिकांच्या अन्यायकारक बदलींविरोधात परिचरिकांच्या संघटनेने संपाचं हत्यार उपसलं होतं. त्यानंतर शासनाशी झालेल्या वाटाघाटींनंतर हा संप मागे घेण्यात आला होता. तरीही आता मेस्मा लागू केल्यामुळे ही मुस्कटदाबी असल्याची प्रतिक्रिया परिचारिका संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.