मुंबई: विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज महिला आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्वे आणि अडचणींचा आढावा घेण्यासंदर्भात विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. विधान भवनात ही बैठक आयोजितकरण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती, सेवा प्रमाणीकरण प्रक्रिया, अंतर्गत अडचणी, अंमलबजावणीची स्थिती, तसंच आयोगाकडून असलेल्या अपेक्षांचा आढावा घेतला जाणार आहे. दुपारी 12 वाजता महिला हक्कांसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद सत्र आयोजित करण्यात आलं आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मागील काही दिवसात महिलांच्या प्रश्नांसंदर्भात, महिला आयोगाच्या कार्यपद्धतीसंदर्भात अनेकांनी विविध मतं मांडली होती. यात महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष, सामाजिक संस्था यांचा समावेश होता. यांना देखील या पहिल्या बैठकीत निमंत्रण देण्यात आलं आहे.

मविआच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार

एकीकडे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगावरती मोठ्या प्रमाणावर टीका झाली त्यानंतर आता विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज महिला आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्वे आणि अडचणींचा आढावा घेण्यासंदर्भात विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती आहे. महिला नेत्यांचं शिष्टमंडळ आज दुपारी बारा वाजता राज्यपालांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, रोहिणी खडसे, खासदार वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे. महिला असुरक्षा, हिंसाचार आणि महिला आयोगाचा अक्षम्य हलगर्जीपणा या संदर्भात चर्चा करणार आहेत. महिला आयोगावर अराजकीय व्यक्तीची नियुक्ती व्हावी, महिला आयोगावर नव्या अध्यक्षाची निवड करावी यावर चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महिला आयोगावर हल्लाबोल

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या कामावरती विरोधकांसह संघटनांनी हल्लाबोल केला. जेव्हा हगवणे परिवारातील मोठ्या सुनेने मयुरी हगवणेची तक्रार महिला आयोगाकडे आली होती, तेव्हाच कारवाई झाली असती, तर आज वैष्णवी हगवणेसोबत असं घडलं नसतं अशी खंत देखील विरोधकांनी बोलून दाखवली. मयुरी हगवणेची तक्रार आल्यानंतर आयोगाकडून कठोर पावलं उचलली गेली असती, तर वैष्णवीचा बळी गेला नसता असं म्हणत महिला आयोगाच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. दरम्यान मयुरीच्या तक्रारीनंतर पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याचं स्पष्टीकरण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी दिलं आहे.