पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर बांधणाऱ्या पुण्यातील मयुर मुंढे यांनी भाजप सोडण्याच्या निर्णय घेतला आहे. शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर टीका करत त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देत असल्याचा निर्णय जाहीर केला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक द्यायची आणि ठेकेदारांना सोबत घ्यायचं असं धोरण आमदार सिद्धार्थ शिरोळेंचं आहे असा आरोप त्यांनी केला. याबाबत भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करूनही आपल्याला कोणतंही उत्तर मिळालं नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
मयुर मुंढे यांनी 2021 मध्ये पुण्यातील औंध भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर बांधलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी मयुर मुंढेंवर होती. मात्र आता स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत मयुर शिंदे यांनी भाजप सोडण्याच्या निर्णय घेतला आहे.
कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक
मयुर मुंढे म्हणाले की, सामान्य कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक द्यायची आणि ठेकेदारांना मात्र सोबत घ्यायचं, त्यांच्या खांद्यावर हात ठेवायचा असं धोरण आमदारांचं आहे. मला फक्त पक्षच दिसतो, पण पक्षाला मी दिसत नाही. निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आपल्याला सिद्धार्थ शिरोळे यांनी अन्यायकारक वागणूक दिली. गेल्या पाच वर्षांतील त्यांची विकासकामं दिसून येत नाहीत. मात्र फुटकळ राजकारण दिसतं. 1995 पासून, गोपीनाथ मुंडेंच्या प्रेरणेने भाजपचे काम सुरू केलं. गावावरून पुण्यात आल्यानंतरही काम करतोय. ज्या भागात भाजपचा झेंडाही लागत नाही त्या ठिकाणी नगरसेवक निवडून आणला.
सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्याकडे तक्रार केली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही तक्रार केली. मात्र आपल्याला कोणतेही उत्तर मिळालं नाही असं मयुर मुंढे म्हणाले. त्यामुळे आता आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी जाहीर केलं.
पक्षाचं काम करून आपल्याला बळ मिळत नसेल तर उपयोग नाही. आपल्याच कार्यकर्त्यांच्या विरोधात दुसरे लोक तयार केले जातात असा आरोपही त्यांनी केला.