मावळ, पुणे : मावळ लोकसभेसाठीचा महायुतीचा (Maval Loksabha Constituency)  उमेदवार अजून जाहीर झाला नाही. मावळ लोकसभेत धनुष्यबाणाचा प्रचार करा, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला. त्यामुळे मावळमधून आता श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यातच बारणेंचं टेन्शन वाढवणाऱ्या सुनील शेळकेंनीदेखील (Sunil Shelke)  अजित पवारांच्या म्हणण्याप्रमाणे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचं सांगितलं. मात्र  आता मावळ लोकसभेत आम्ही महायुतीचा धर्म पाळू, याचा अर्थ सुनील शेळकेंनी यूटर्न घेतला, असा अर्थ काढू नका. महायुतीने श्रीरंग बारणेंना उमेदवारी दिली तर आम्हाला नक्कीच विचार करावा लागेल, असं म्हणत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीबाबतची भूमिका राखून ठेवली आहे. त्यामुळे आता उमेदवारी जाहीर झाल्यावर मावळमध्ये नवा ट्विस्ट बघायला मिळतो का ?, हे पाहावं लागणार आहे. 


काय म्हणाले सुनील शेळके?


सुनील शेळके म्हणाले की, अजित पवारांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. ते जो आदेश देतील त्याचं सगळेजण प्रामाणिकपणे पालन करु मात्र अजून मावळ लोकसभेची जागा ही भाजपला, शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला दिली असल्याची घोषणा झाली नाही. राज्यात महायुतीचं सरकार आणि अजित पवारदेखील याचाच भाग आहे. युतीचा धर्म पाळणं हे कार्यकर्त्यांचं काम आहे. त्यामुळे महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचा जोमात प्रचार करु. मात्र अजून उमेदवार जाहीर झाला नाही. ज्यावेळी जाहीर होईल त्यावेळी पुढची भूमिक घेऊ.


जनतेचं मत अन् कार्यकर्त्यांच्या भावना मांडतो!


मी कोणत्याही प्रकारचा युटर्न घेतला नाही. उमेदवार जाहीर झाल्यावर सगळं चित्र स्पष्ट होईल. त्यासोबत जनता आणि कार्यकर्ता हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे मी जनतेचं मत आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि याच जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना मी मांडतो, असंही ते म्हणाले. 


इतर महत्वाची बातमी-