पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये मराठा नेत्यांना कोणताच कार्यक्रम, सभा, बैठका घेऊ देणार नाही, असं मराठा क्रांती (Maratha reservation) मोर्चाने जाहीर केलं होतं. तरी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आले. ते येताच त्यांना विरोध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. दानवे यांचा निषेध करण्यासाठी त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला. तसेच मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी घोषणाबाजी केली. 


काळे झेंडे दाखवणाऱ्या सतीश काळेसह एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सकाळपासून मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते  आणि महिला वायसीएम रुग्णालय परिसरात दिसून येत होते. पोलिसांकडून त्यांची धरपकड सुरूच होती. पण अशात सतीश काळे आणखी एकासह लपून बसले होते. दानवे वायसीएममध्ये येताच त्या दोघांनी काळे झेंडे दाखवत, एक मराठा - लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका ही त्यांनी घेतली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.


काही वेळ गोंधळाचं वातावरण...


अंबादास दानवे हे वायसीएममध्ये येत असल्याचं समजल्यानंतर महिला त्यांना विरोध करण्यासाठी जमल्या होत्या. त्या दानवेंच्या ताफा अडवण्याचा प्रयत्नात होते मात्र पोलिसांना कळताच त्या सगळ्या महिला आणि बाकी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी काही प्रमाणात गोंधळाचं वातावऱण निर्माण झालं होतं.


राजकीय नेत्यांना अनेक गावात बंदी


मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे मराठे एकवटले आहेत आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाज मागील 40 वर्षापासून आंदोलन करत आहे. हा समाज शेतीवर अवलंबून आहे. आतापर्यंत सात लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची हेडसांड होते आहे आणि त्यांना नाहक त्रासदेखील सहन करावा लागत आहे. ही सगळी परिस्थिती पाहून जरांगे पाटलांनी 17 दिवसांचं आमरण उपोषण केलं होतं. त्यानंतर 40 दिवसाची मुदत दिली होती. मात्र सरकारने त्यावर काहीही उत्तर दिलं नाही. समाजाला पाठिंबा देण्याचं उपोषण करा आणि त्यासोबतच सर्व राजकीय नेत्यांना त्यांनी अनेक गावात बंदी घातली आहे. त्यामुळे कोणत्याही नेत्याने पिंपरी-चिंचवडमध्ये सभा घेऊ नये अन्यथा समाजाकडून कार्यक्रमाला विरोध केला जाईल, असा इशारा मराठा समाजाच्या नेत्यांनी दिला.