पुणे : बारामतीपाठोपाठ आता दौंडमध्येही (Ajit Pawar) अजित पवारांना (Maratha Reservation) विरोध होताना दिसत आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला अजित पवारांनी येऊ नये, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चा यांनी घेतली होती. त्यानंतर दौंड तालुक्यातील दौंड शुगर येथे अजित पवारांना मोळी पुजनाला बोलावू नका, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चा घेतली आहे. मराठा क्रांती मोर्चाने पत्र पोलीस प्रशासनाला दिला आहे. 


येत्या गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते दौंड शुगरचा मोळी पूजन समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास मराठा क्रांती मोर्चा विरोध केला आहे. 28 तारखेला बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांना मोळी पूजनाला येऊ देणार नाही, अशी भूमिका मराठी क्रांती मराठा क्रांती मोर्चाने घेतली होती. त्यानंतर तीव्र विरोध झाल्याने कार्यक्रमाला येणं अजित पवारांनी टाळलं होते. अर्थात हा कारखाना सहकारी तत्त्वावर चालवतो. पण दौंडमध्ये अजित पवारांच्या खाजगी मालकीचा कारखाना आहे. त्या कारखान्यावरती देखील मराठा क्रांती मोर्चाने अजित पवारांना येण्यास विरोध केला आहे. अजित पवार या कारखान्याच्या मोळी पूजनाला येतात का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


मराठा आरक्षणावरुन मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना आणि पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक गावात पुढाऱ्यांना येण्यास विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत. मात्र ज्या भागात अजित पवारांनी मोठा विकास केला आहे, त्याच भागात आता अजित पवारांना येण्यास वारंवार नकार दिला जात आहे आणि त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठ्यांकडून देण्यात येत आहे. 


अजित पवारांच्या फोटोला काळं फासलं!


बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या काही तरुणांनी अजित यांच्या पोस्टरला काळे फासले आहे. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या. बारामती- निरा रस्त्यावर लावलेल्या एका फलकावर अजित पवार यांचा वरील बाजूस फोटो होता. संतप्त मराठा कार्यकर्त्यांनी त्यास काळे फसले आहे. दोन दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या रोषामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माळेगाव सहकारी साखर कारखाना येथील गळीत हंगामासाठीचा दौरा रद्द करावा लागला होता.