‘आपलं घर’ योजनेत घर बुकिंग करणाऱ्यांना पैसे परत मिळणार
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 20 Apr 2016 02:59 PM (IST)
पुणे : ‘एबीपी माझा’च्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालं आहे. नागरिकांना स्वस्त घराचं स्वप्न दाखवणाऱ्या मेपल ग्रुपने नागरिकांना पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे. ‘आपलं घर’ योजनेत घर बुकिंग केलेल्या नागरिकांना पैसे परत करण्याची माहिती मेपल ग्रुपने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. पाच लाखांत स्वस्त घर देण्याचा दावा करणाऱ्या ‘आपलं घर’ योजनेत ज्या नागरिकांनी घर बुक केलं आहे, त्यांचे पैसे परत केले जात आहेत. मात्र, याआधी ज्यांनी घर बुक केले आहेत, त्यांचे पैसे परत दिले जात नाहीत. खरंतर मेपल ग्रुपला नागरिकांचे पैसे परत करण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वीच देण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांपासून मेपल ग्रुपने सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. मात्र, आता अटक टाळण्यासाठी मेपल ग्रुपने नागरिकांचे पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे. मेपल ग्रुपने आज दुपारपासून ‘आपलं घर’ योजनेत घर बुक केलेल्या नागरिकांचे पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे.