पुणे : मनोज जरांगे यांना (Manoj Jarange)  लेखी टाईम बॉन्ड देण्यासाठी येणाऱ्या शिष्टमंडळाकडून फक्त तारीख पे तारीख दिली जात असल्याचे चित्र आहे. आपण आजचं सरकारमधील काही मंत्र्यांना थेट फोन करून याबाबत जाब विचारणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. तर, टाईम बॉन्ड देणार की नाही याबाबत आज सरकारला शेवटचं विचारणार असल्याचे जरांगे म्हणाले. त्यामुळे टाईम बॉन्डवरून सरकार आणि जरांगे पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची (Maratha Reservation) शक्यता आहे. राज्यात आतापर्यंत 29 लाख नोंदी सापडल्याचा दावा देखील मनोज जरांगेनी केला आहे.  पुण्यातील खराडी भागात आज मनोज जरांगेंची सभा झाली. या सभेत ते बोलत होते. 


मनोज जरांगे म्हणाले,  1805 पासून 1967 पर्यंत आणि सगळे पुरावे शोधण्याचे काम सुरू झाले आहे.  ओबीसी प्रवर्गत मराठे असल्याचं समोर आले आहे. राज्यात आतापर्यंत 29 लाख नोंदी सापडल्या आहेत.  मग जर मराठा  आरक्षणात येतो. तर 70 वर्षांपासून मराठ्यांचे कुणी वाटोळं केले याचे उत्तर द्या. आरक्षण कुणी मिळू दिल नाही त्याचं नाव आम्हाला द्या. आमचं भविष्य यांनी पूर्ण उध्वस्त केले आहे.  आम्हला 70 वर्षा आधी आरक्षण दिलं असते तर जगात प्रबळ जात म्हणून एक नंबरला मराठे राहिले असते. आमचा नोकरीतला टक्का घसरला आणि ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ आमच्यावर आली. 


आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला पाहिजे : जरांगे 


मराठा आरक्षणची लढाई खूप वर्षांपासून सुरू आहे. अनेकांनी टोकाची झुंज दिली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत सरकारला आता बिलकुल सुट्टी नाही, आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला पाहिजे. आम्ही कुणाचं घेत नाहीत पण आमचं मात्र आम्ही मिळवणार यात काही शंका नाही. ओबीसींना मिळालेले आरक्षण त्यांनी घ्यावं त्यांचा एक टक्का देखील आम्हाला नको, असे मनोज जरांगे यावेळी म्हणाले. 


ज्या नेत्यांना मोठे केले त्यांनी आज पाठ फिरवली: जरांगे 


मराठा समाज कायम सगळ्यांच्या कल्याणासाठी लढत राहिला. आम्ही कधी जातीवाद  केला नाही. मराठा बांधवांनी कधीच कुणाची जात शोधली नाही. स्वतःच लेकरू उघड पडलं पण दुसऱ्याच्या लेकरांना सगळं दिले. जात कधी त्यांनी मानली नाही. माझ्या बापाने लोकांच्या लेकरांच्या डोळ्यातलं पाणी पुसवण्याचं काम केलं. लोकांना माझ्या बापाने पोटभर दिलं. आरक्षण देताना देखील आम्ही कधीच भेदभाव केला नाही. स्वतःच्या हक्कच आरक्षण दुसऱ्याला दिले. आम्ही सगळ्या समाजाला सढळं हाताने मदत केली. 75 वर्षात या राज्यात जेवढे पक्ष झाले त्या पक्षातल्या नेत्यांना मोठे करण्याचे काम मराठा समाजांने केलं. आमच्या बांधवांनी कधी जात बघितली नाही. या नेत्यांना मराठ्यांनी मोठं केलं. मदत लागली तर हे धावून येईल म्हणून यांना मोठं केलं ज्यांना मोठं केलं ते देखील आज लेकराची मदत करायला तयार नाहीत, असे जरांगे म्हणाले.


आपली लढाई आपल्याला लढायची आहे : जरांगे 


मराठा समाजाने ज्या नेत्यांवर  विश्वास ठेवला आणि त्यांनीच आपला घात केला. समाज यांच्यासाठी राबला आणि याना मोठे केले. एकही नेता तुमच्याकडे बघायला तयार नाही आता तरी जागे व्हा. आपल्या लेकरांच्या आक्रोश ऐकायाला आता कुणी राहिला नाही. कुणाची मदत आपल्याला होणार नाही. ज्यांना आपण मोठे केले तो आपल्यासमोर उभा आहे आणि म्हणतोय आरक्षण मिळू देणार नाही त्यामुळे जागे व्हा, आपली लढाई आपल्याला लढायची आहे असे देखील जरांगे या वेळी म्हणाले.