पिंपरी-चिंचवड : कोरोनाच्या निर्बंधात साजऱ्या होणाऱ्या यंदाच्या भोगी आणि संक्रातीच्या सणाला महागाईचा फटका बसू लागला आहे. पुण्याच्या मावळमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात खरेदीला महिलांची गर्दी जाणवत आहे. पण सणाला लागणाऱ्या भाज्या आणि इतर वस्तूंची किंमत वाढल्याने नागरिकांना आखडता हात घ्यावा लागत आहे. वाढलेल्या महागाईमुळे त्यांना भोगी आणि संक्रात थोडक्यात उरकावी लागत आहे. परिणामी या सणांवर अवलंबून असणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील याचा फटका बसत आहे. नववर्षातील पहिल्याच सणात हिरमोड झाल्याने महिलावर्गात आणि छोट्या व्यवसायिकांमध्ये कमालीची नाराजी पसरल्याची पाहायला मिळत आहे. दरम्यान सणाला अवघा एक दिवस शिल्लक असताना सणासाठी वापरणाऱ्या विविध वस्तूंच्या किंमतीवर एक नजर...
 
बुधवारचे बाजारभाव
  • हरभरा - 30 रुपये गड्डी
  • ऊसाची कांडी - 30 रुपये
  • ज्वारीचे कणीस - 20 रुपये नग
  • बोर - 120 रुपये किलो
  • गाजर - 60 रुपये किलो
  • शेंगा - 120 रुपये किलो
  • काळे मडके - 30 रुपयाला 5 नग
  • ओवसा मिक्स वाटा - 50 रुपये
निर्बंधांमुळे देहूतील तुकाराम महाराज मंदिरही बंद
 
कोरोनाचा वाढता लक्षात घेता सरकारने काही निर्बंध घातले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पुणे जिल्ह्यातही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. मकर संक्रांतीला  ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता देहूतील संत तुकाराम महाराज मंदिर देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मकरसंक्रांती निमित्ताने माऊलींना आणि संत तुकाराम महाराज यांना ओवसा करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आळंदीत येत असतात, यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 14 जानेवारीच्या पहाटे 5 पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली आहे.
 
महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha