Pune Bypoll election : पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराची (pune bypoll election)रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचारासाठी यात्रेवर भर आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे  रविंद्र धंगेकर या दोन्ही उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. कसब्यात हिंदू महासांघाचे आनंद दवेदेखील लढणार आहे. त्यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे.


दिवंगत आमदार मुक्ता टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन आठवड्याचा कालावधी आहे. त्यामुळे योग्य नियोजन करुन दोन्ही पक्षांकडून प्रचाराची आखणी करण्यात आली आहे. त्यात रोड शो, प्रचार सभा आणि वैयक्तित भेटींवर भर दिला जाणार आहे. दोन्ही पक्षामध्ये तगडी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून कसबा कसा राखता येईल, यासाठी प्रयत्न सुरु आहे.


प्रचारासाठी महाविकास आघाडीची पदयात्रा आहे. रविंद्र धंगेकर आणि स्थानिक नेते सहभागी होणार आहे. महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी तयार झाली आहे. ते सगळे या प्रचारात सहभागी होणार आहे. त्यामुळे यंदा महाविकास आघाडीची प्रचाराची जय्यत तयारी दिसत आहे. सोमवारी आदित्य ठाकरे येण्याची शक्यता आहे मात्र प्रचार सभेचा नारळ फोडण्यासाठी महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे नेते नाना पटोले, विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांची संध्याकाळी सहा वाजता एकत्रित सभा घेणार आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. त्यासोबतच महत्वाची मानली जाणारी चिंचवडची निवडणूक आहे. चिंचवडचे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्यासाठी अजित पवार यांची प्रचार यात्रा आहे. 


भाजपनेदेखील फोडला प्रचाराचा नारळ



भाजपचीदेखील जोरदार तयारी सुरु आहे. वैयक्तित भेटी आणि पदयात्रेवर भर दिला जात आहे. भाजपच्या प्रचारासाठी तब्बल 40 स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन आठवडे प्रचार होणार आहे. त्यात महत्वाचं म्हणजे कसब्याच्या आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी थेट देशाचे गृहमंत्री पुण्यात दाखल होणार आहे. त्यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, भागवत कराड, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ,विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, गिरीश बापट, मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील प्राचारासाठी पुण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाने प्रचारासाठी चांगलीच कंबर कसल्याचं दिसत आहे.