Maharashtra SSC 10th Result 2022 : दहावीचा आज  निकाल जाहीर झाला. अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळाले. तर काही  विद्यार्थ्यांना अपयश आले.  मात्र पुण्यातून एकाच घरातून वडील आणि मुलांनी एकाच वेळी परीक्षा दिली. परीक्षेनंतर वडील आणि मुलगा दोघेही पास होतील अशी अपेक्षा घरातील सर्वांना होती.. मात्र जेव्हा निकाल आला तेव्हा वडील पास झाले आणि मुलगा मात्र नापास झाला. जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या भास्कर वाघमारे यांच्या कुटुंबात दहावीच्या निकालानंतर कभी खुशी कभी गम असं चित्र पाहायला मिळाले. 


भास्कर वाघमारे आणि त्यांचा मुलगा साहिल वाघमारे यांनी यावर्षी दहावीची परीक्षा एकत्र दिली.  तीस वर्षापूर्वी घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे भास्कर वाघमारे यांना सातवीनंतर आपले शिक्षण सोडावे लागले. मात्र तरीही जिद्द न हारता भास्कर वाघमारे यांनी वयाच्या 43 व्या वर्षी पुन्हा नव्या जोमाने दहावीची परीक्षा दिली आणि या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. 


1992 ला सातवी उत्तीर्ण होते नंतर तीस वर्षानंतर दहावीचा अर्ज भरून ते 46 टक्क्यांनी उत्तीर्ण झाले आहेत. भास्कर हे टेम्पो चालक आहेत तर त्यांच्या पत्नी गृहिणी आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे तर यंदाच्या दहावीच्या परीक्षेत त्यांचा मुलगा साहिल भास्कर वाघमारे हा अनुत्तीर्ण झाला आहे. अपयशाला भिडायचं असतं घाबरायचं नसतं पुढील वेळी जोमाने अभ्यास करून उत्तीर्ण हो असा दिलासा देखील त्यांनी आपल्या मुलाला दिला. भास्कर यांच्या कामगिरीने कुटुंबात आणि  परिसरात आनंदाचे वातावरण आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09  टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :




Maharashtra ssc 10th result 2022: शत प्रतिशत निकाल! 12 हजार शाळांचा रिझल्ट 100 टक्के