Maharashtra Pune Water Issue News: महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच आता पुण्याचं नाव अग्रेसर येत असल्याचं चित्र आहे. पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. पण पुणेकरांना मात्र लाल पाण्याची शिक्षा भोगावी लागतेय.


गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील कोंढवा-कात्रजयेथील येवलेवाडी परिसरात साईद्वारकाचे बिल्डर विशाल पवार यांच्याकडून दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्याचा रंग चक्क लाल आहे. हे पाणी पिण्यायोग्य तर नाहीच मात्र वापरण्यायोग्यही नाही आहे. त्यामुळे नागरिक संपातले आहेत.  त्यामुळे बिल्डरकडून हजारो नागरिकांच्या जिवाशी खेळ होत असल्याचं पाहायला मिळतंय. 


कात्रज-येवलेवाडी परिसरातील साई द्वारका ही मोठी सोसायटी आहे. सगळ्या सुविधा मिळेल असं बिल्डरकडून सांगण्यात आल्याने नागरिकांनी या सोसायटीमध्ये फ्लॅट खरेदी केले. मात्र तिथे रहिवासी असणाऱ्या नागरिकांना पाण्याच्या प्रश्वाला तोंड द्यावे लागत आहे. रोजच्या वापराचं पाणी दुषित येत असल्याने नागरिकांनी आंदोलन करत संताप व्यक्त केला आहे. 


आम्हाला लाल पाण्याची शिक्षा मिळत असल्याचा संताप पुणेकर व्यक्त करत आहेत. दुषित पाण्यामुळे अनेकांना आजारही जडत आहेत. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे याच जिल्ह्यातले आहेत. असं असतानाही त्यांच्याच जिल्ह्यात लोकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. हे पाणी प्यायल्याने रहिवाशांना त्रास होत आहे. यामुळे साई द्वारिका सोसायटीतील राहणारे प्रत्येक सदस्य हे शुद्ध पाणी पिण्यासाठी व वापरासाठी मिळावे यासाठी हंडा कळशी घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. 


बिल्डरकडून टॅंकरने मिळणारे पाणी पिण्यायोग्य नाही, त्यामुळे आमच्यामुलांना आजार उद्भवू शकतो. मुलांना किंवा कुटुंबीयांना या दुषित पाण्यामुळे काही झालं तर यासगळ्याला जबाबदार कोण असेल? त्यामुळे आम्हाला महापालिकेकडूनच पाणी देण्यात यावं, अशी मागणी महिलांनी केली आहे.


दरम्यान, पुण्यातील कात्रज- कोंढवा किंवा येवलेवाडीच नाही तर उपनगर म्हणून महापालिकेत 23 गावांचा समावेश करण्यात आला. मात्र या गावातही मुलभूत सुविधांची कमतरता आहे. या सगळ्या प्रश्नांमुळे पालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.