Maharashtra Pune News : शिवसेना (Shiv Sena) नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) प्रकरणात माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे आहेत, असं म्हणत भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. मी पीडितेला सर्वतोपरी मदतचं केली. तरीही माझ्यावरच खोटे आरोप करण्यात आल्याचंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना मेल/लेखी अर्जाद्वारे केली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसेच, पोलीस सखोल चौकशी करतील ही अपेक्षा असल्याचंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.
पुण्यातील शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावरती बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेनं काही दिवसांपूर्वी तिला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी फुस लावल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं. या प्रकरणात शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यासह आठ लोकांवरती गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये 19 फेब्रुवारी रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या पीडितेनं भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरून आपण रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तक्रार दिल्याचं खळबळजनक दावा केला आहे.
पीडितेचं म्हणणं काय?
पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करणाऱ्या पिडीत महिलेनं केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. या पीडितेच्या दाव्यानुसार, चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरून तिनं हे सगळं केलं होतं. मला सुसाईड नोट लिहण्यासही भाग पाडले तसेच खोटे मेसेज वाचून दाखवले, जे मी पाठवलेच नाहीत किंवा त्यांनी पाठवले नाहीत. त्यामुळे मी या सर्वांबाबत पोलिसांना बोलणार असल्याचंही पीडितेनं म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
17 फेब्रुवारी 2022 ही घटना पहिल्यांदा समोर आली होती. तरुणीने याच दिवशी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. लग्नाचे आमिष दाखवत माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, त्यानंतर माझा जबरदस्तीने गर्भपात देखील केल्याचा आरोप तरुणीने कुचिक यांच्यावर केला होता. हा सगळा प्रकार पुण्यातील प्राईड हॉटेल, गोव्यातील बाय द बीच या हॉटेलमध्ये नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2022 मध्ये घडल्याचं या तरुणीने सांगितलं. यानंतर रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात कलम 376, 313 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्या तरुणीसोबत मुंबईत पत्रकार परिषद घेत रघुनाथ कुचिक यांना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान या प्रकरणात न्यायालयाने रघुनाथ कुचिक यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.