पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पीएचं नाव सांगून जमीन व्यवहारात फसवणूक केल्याची घटनेची चर्चा सुरू आहे. अशातच आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीए सोबत ओळख असल्याचं, सांगून पुण्यातील वारजे भागात राहणार्या एकाची 10 लाख रूपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण विठ्ठल जगताप (रा. वाई, सातारा) आणि एक अनोळखी व्यक्ती अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रवीण विठ्ठल जगताप यास अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेतर्फे विविध विकास कामे केली जातात. त्यापैकी 5 कोटी रुपयांचे बजेट लॉकिंग करून देतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए मुसळे यांच्याशी ओळख आहे. तुमचे काम होऊन जाईल, असे आरोपी प्रवीण विठ्ठल जगताप आणि त्याच्या एका साथीदाराने फिर्यादी महेश पटवर्धन यांनी सांगितले. त्यावर महेश पटवर्धन यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर पटवर्धन यांनी आरोपीला 10 लाख रुपये दिले, पण तो काही काम करीत नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी तक्रार दिली. तक्रारीनंतर आरोपी प्रवीण जगताप यास अटक केली असून, अधिक तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले.
दरम्याना या अगोदरही पिंपरी चिंचवडमध्येही अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून एका बांधकाम व्यावसायिकाकडून वीस लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून केलं जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha