Chandrakant Patil : पुणे : पुण्याचे पालकमंत्री पद चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे गेल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. पुण्याचे पालकमंत्री (Pune Palakmantri) पद गेल्यानंतर भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. पालकमंत्री पद देणे ही मोठ्या कामासाठी केलेली छोटी तडजोड असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे आता कोणत्या मोठ्या कामासाठी ही तडजोड करण्यात आली, याची चर्चा सुरू झाली आहे. 


राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीचा एक गटही सरकारमध्ये सहभागी झाला. त्यानंतर अजित पवार यांना पालकमंत्री म्हणून पुणे जिल्ह्याची जबाबदारी देणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही जबाबदारी अजित पवार यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचे पंख छाटण्यात येत आहे का, अशी चर्चा सुरू झाली होती. तर, अजित पवार यांना पुण्याची जबाबदारी दिल्याने पुण्यातील भाजपच्या अडचणी वाढून राष्ट्रवादीला मोकळं रान मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. 


या पालकमंत्री पदावर अखेर आज चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच  भाष्य केले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते. त्यांनी म्हटले की, माझ्याकडून पुण्याचे पालकमंत्रीपद गेल्याने अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. कोणीही नाराज व्हायचे कारण नाही, असेही त्यांनी म्हटले. पालकमंत्री पद देणे, ही एका कामासाठी केलेली छोटीशी तडजोड आहे, असे पाटील यांनी म्हटले. 


बारामती लोकसभा जिंकण्याची आता संधी


मागील दोन लोकसभा निवडणुकीपासून भाजपने बारामती लोकसभेची जागा जिंकण्यासाठी जोर लावला आहे. मागील काही महिन्यांपासून भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांपासून अनेकांनी बारामतीला भेट दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी बारामती लोकसभा जिंकण्याची आता संधी असल्याचे वक्तव्य केले. यावेळी जिंकलो‌ नाही तर पुन्हा कधीच जिंकणार नाही. त्यामुळे मतभेद, वाद बाजूला ठेवून कामाला लागा, अशी ‌सूचनाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.


कडू घोट घ्यावा लागतो...


दरम्यान,  अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर भाजप समर्थकांमध्ये चलबिचल झाली होती. काही महिन्यांपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला असल्याचे म्हटले होते. भविष्यातील काही सकारात्मक गोष्टींसाठी कडू निर्णयाचा घोट घ्यावा लागतो, अशा आशयाचे वक्तव्य केले होते.