Tanaji Sawant : शिवेसेनचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे जवळपास 40 आमदार घेऊन आसाममधील गुवाहटीत पोहोचले आहेत. त्यामुळं राज्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहे. काही ठिकाणी आंदोलने, मोर्चे निघत असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच शिवेसेनेचे भूम-परांडा तालुक्याचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला करण्यात आला असून, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांविरोधात आमचा लढा
दरम्यान, आज तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला केल्यानंतर पर्वती विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख सुरज लोखंडे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांविरोधात आमचा लढा आहे. हे आमदार शिवसैनिक नाहीत. शिवसेना काय आहे ते यांना माहिती नाही. तानाजी सावंतांना मंत्रीपद न दिल्यामुळं ते नाराज होते. ते भाजपमध्ये जाण्याच्या चर्चाही होत्या असे लोखंडे म्हणाले. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या आंदोलनात सामील होते. ही सुरुवात असल्याचा इशारा सुरज लोखंडे यांनी दिला. आमचा आक्रोश हा शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांशी तसेच शिवसेनेच्या जीवावर मोठं होणाऱ्या बंडखोरांशी आहे. त्यांची ताकद असेल तर त्यांनी धनुष्यबाणाचं चिन्ह आणि बाळासाहेबांचा फोटो न वापरता निवडून येऊन दाखवावं असेही लोखंडे यावेळी म्हणाले.