Pune Crime: इंस्टाग्रामवरील एका क्षृल्लक कारणामुळे दोन संघात वाद झाला. त्यामुळे तीन अल्पवयीन मुलांनी एका मुलावर शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक या परिसरात ही घटना घडली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टेटसमुळे दोन संघात वाद झाला. दोन्ही संघाकडून शेअर करण्यात आलेली माहिती एकमेकांना खटकली. या कारणामुळे धारदार शस्त्राने हे वार करण्यात आले आहे.याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे शहरातील वडगाव बुद्रुक परिसरात रविवारी सुमारे साडे चार वाजता ही घटना घडली. पीडित एटीएममध्ये पैसे काढायला गेला होता. त्यादरम्यान आरोपी असलेल्या तिघांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर भरदिवसा आरोपी असलेल्या तीन मुलांनी धारदार शस्त्रांनी अल्पवयीन मुलावर हल्ला केला. या घटनेत पीडित गंभीर जखमी झाला आहे.
दोन्ही संघ इंस्टाग्रामवर सक्रिय होते. त्यावर अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी शेअर करायचे. पीडित मुलाने शेअर केलेला कन्टेन्ट खटकला. त्यावरुन दोघांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला मात्र दोन्ही संघ माघार घ्यायला तयार नव्हते. अखेर त्यांनी सापळा रचून अल्पवयीन मुलाला गाठलं आणि त्याच्यावर हल्ला केला.तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
वडगाव बुद्रुक येथे भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेची माहिती स्थानिक लोकांकडून जमा करण्यात येत आहे. त्या महितीवरुन पोलिसांनी टीम तयार केली असून हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. ज्यामध्ये तीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.
मध्य प्रदेशमध्येही घडली होती अशी घटना
गेल्या आठवड्यातही मध्य प्रदेशच्या इंदूरमधून इंस्टाग्राम स्टेटसवर केलेल्या कमेंटबाबत एक प्रकरण समोर आले होते, ज्यामध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलावर ब्लेडने हल्ला केला होता. या घटनेत विद्यार्थ्याच्या मानेला व कानाच्या मागच्या बाजूला गंभीर दुखापत झाली होती. मानेला 12 टाके पडले आहेत. यासोबतच आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या कानाची नस खराब झाली होती.