पिंपरी चिंचवड : नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी यासाठी सरकारकडून वारंवार आवाहन केलं जात आहे, जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जात आहेत. मात्र अजूनही अनेक जण लस घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं दिसून येत आहे. यात महापालिका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने याबाबत नामी शक्कल लढवली आहे. कोरोना लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्याचं वेतन स्थगित केलं जाईल, असं परिपत्रक महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढलं आहे. लस घेण्यासाठी 20 जुलैपर्यंतची मुदतही देण्यात आली आहे. 


सर्वसामान्यांनी लस घ्यावी अशी जनजागृती प्रशासन करत असताना, महापालिकेचा कर्मचारी लस अभावी मागे राहू नये, म्हणून वेतन स्थगित करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल तर त्यांचे वेतन स्थगित होऊ शकतं.  


पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण 7 हजार 479 कर्मचारी आहेत. यात अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त झालेले पेन्शनधारक कर्मचारी, मानधनावरील तसेच ठेकेदारपद्धतीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत, मात्र काही कर्मचाऱ्यांनी अद्यापही लस घेतलेली नाही. अशा कर्मचाऱ्यांनी 20 जुलैपर्यंत लस न घेतल्यास त्यांचं वेतन स्थगित होऊ शकतं, असं आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे सूचित केलं आहे.


लसीबाबत कर्मचाऱ्यांना अनेकदा विनवण्या, सूचना करण्यात आल्या आहेत. पण आता आयुक्तांना थेट परिपत्रक काढून वेळकाढूपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तंबी दिली आहे. कोविड लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी ही महापालिका असते. परंतु महापालिकेचे कर्मचारीच याबाबत उदासिन असणं ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी नामी शक्कल लढवली आहे. कर्मचाऱ्यांनी कोरोना लस न घेतल्यास वेतन स्थगित करण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. आयुक्तांचं हे परिपत्रक गांभीर्याने घेत कर्मचारी कोरोना लस घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.