Gopichand Padalkar : 2024 ला पवारांचे विसर्जन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) बारामतीत आले आहेत. श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे शरद पवारांना (Sharad Pawar) पळून जावं लागणार असल्याचा हल्लाबोल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला. भाजपच्या 'मिशन बारामती' निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या (BJP) मेळाव्यात पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, एखाद्याला फसवून घ्यायचं लुबाडून घेण्यात बारामतीकारांना फार आनंद असतो. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा सुप्रिया सुळे या वरमाई सारख्या फिरत होत्या. निर्मला सीतारामन या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल हे पवारांना कळणार देखील नसल्याचे पडळकर यांनी म्हटले.
हा बालेकिल्ला नाही तर साधी टेकडी
बारामती हा बालेकिल्ला नसून शरद पवारांची टेकडी असल्याचे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले. मी दोन वर्ष ही टेकडी ठोकून काढत आहे. पवारांचे राजकारण हे पोलिसांवर चालते. माझ्यावर खूप केसेस आहेत. या केसेस म्हणजे अंगावरील दागिना समजा असेही पडळकरांनी कार्यकर्त्यांना म्हटले. अजित पवारांनी बंड केले तेव्हा दोन तृतीयांश आमदार त्यांच्या मागे राहिले नाहीत. एकनाथ शिंदे 50 आमदार घेऊन गेले. फडणवीस यांना यांना सत्तेत बसू द्यायचं नव्हतं. तरीदेखील ते सत्तेत आले, हे शरद पवारांचे दुःख असल्याचे पडळकर यांनी म्हटले.
महाविकास आघाडीने काहीच केलं नाही
महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांची वीज तोडण्यात आली. जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे ऊर्जामंत्री होते, तेव्हा एकाही शेतकऱ्याची वीज जोडणी तोडण्यात आली नाही, असेही पडळकर यांनी म्हटले. मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारला देता आले नाही. ओबीसी आरक्षण फडणवीस सत्तेत आलं की परत मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले. मी बारामती विधानसभेत निवडणुकीला उभा राहिलो होते. माझं डिपॉझिटही जप्त झालं होतं. तेव्हा इतकी माणसं होती ती गेली कुठं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
हे तर भाजपचे यश
पाकिस्तानची मॅच जिंकल्यावर हात वरून शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला. आज त्यांना आरती करताना व्हिडिओ टाकावे लागत आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे यश असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. आजच्या मेळाव्यातील उत्साह बघितला तर पवार अस्वस्थ होतील, असेही पडळकर यांनी म्हटले.
ज्याला तिकीट नाकारले, तीच व्यक्ती 288 मतदारसंघात उमेदवारी देणार
भाजपमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा नेहमीच सन्मान होत असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट दिले नव्हते. आता बावनकुळे हे 288 मतदारसंघात तिकीट वाटप करणार असल्याचे पडळकर यांनी म्हटले.