पुणे: बलदंड शरीरं,  झटापट, धोबीपछाड, आदळ-आपट आणि डावपेच असे सर्व प्रकार एकाच खेळात पाहायला मिळतात, तो खेळ म्हणजे कुस्ती.


एकमेकांविरोधात त्वेषाने लढून, समोरच्या पैलवानाला चीतपट करण्याचा प्रयत्न प्रत्येक मल्लाकडून होत असतो. मात्र याच कुस्तीने एक अनोखंपण जपलं आहे. ते म्हणजे कुस्तीतील खिलाडूवृत्ती आणि वरिष्ठ खेळाडूला दिलेला सन्मान.

कुस्तीतील हीच खिलाडूवृत्ती आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतही पाहायला मिळाली.

वयाच्या पस्तीशीत पोहोचलेला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आज महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात उतरला. चंद्रहारच्या खजिन्यात 2007 आणि 2008 सालच्या महाराष्ट्र केसरीची गदा आहे. त्यानंतर कामगिरीतला चढउतार आणि बळावलेली दुखापत यामुळं चंद्रहारला महाराष्ट्र केसरी जिंकता आला नाही.



गेल्या अनेक वर्षांपासून दुखापतींमुळे कुस्तीच्या आखाड्यातून दूर असलेला चंद्रहार महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात उतरला. मात्र पहिल्याच फेरीत चंद्रहारला खूपच ज्युनिअर असलेल्या हिंगोलीच्या गणेश जगतापने चीतपट केलं.

क्रिकेटसारख्या खेळात मोठ्या फलंदाजाची विकेट घेतल्यानंतर, नवखे गोलंदाज कसा आनंद साजरा करतात, हे आपण पाहिलं आहे.

तसंच कुस्तीत चंद्रहारसारख्या बलाढ्य पैलवानाला चीतपट केल्यानंतर, कोणत्याही ज्युनिअर मल्लाने जल्लोष साजरा केला असता. मात्र कुस्ती हा खेळच वेगळा आहे.

विजेता पैलवान गणेश जगताप सामना जिंकल्या जिंकल्या, थेट चंद्रहार पाटीलच्या पाया पडला. चंद्रहार हा डबल महाराष्ट्र केसरी विजेता आहे. कुस्ती या खेळासाठी त्याच्यासारख्या पैलवानांचं योगदान मोठं आहे.

या खेळासाठी आणि वरिष्ठ खेळाडूचा मान राखण्यासाठी गणेश जगतापने थेट चंद्रहारचे आशीर्वाद घेतले.

गणेश जगतापने स्वत: पराभूत केलेल्या पैलवानेचे आशीर्वाद घेतल्याने, उपस्थित शौकिनांनी त्याचं कौतुक केलं. गणेशने कुस्ती तर जिंकलीच, शिवाय मनंही जिंकली.