Pune Crime News :पुण्यातील (Pune) मावळ (Maval) तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मावळातील इंदोरी(Indori) गावात कार नदीत बुडाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर केलेल्या तपासणीत एकच मृतदेह सापडल्याचे समोर आले. याप्रकरणी तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बुडालेल्या कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, कारमध्ये आणखी कोणी होते का? त्याचा आता शोध घेतला जात आहे.
काय आहे प्रकरण-
पुण्यातील मावळ तालुक्यात एक कार नदीत बुडाल्याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.मावळातील इंदोरी गावातील इंद्रायणी नदीच्या पुलावरून पाहणी केली असता एक कार नदीत पूर्णपणे बुडाल्याचे दिसून आले. या कारचा फक्त वरचा भाग पाण्यात तरंगत होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर गाडीच्या आत एक मृतदेह आढळून आला.
गाडीत नेमक्या किती व्यक्ती होत्या याची पोलीस चौकशी करत आहेत. या संपूर्ण घटनेचा तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी. कारची अवस्था आणि मृतदेहावरुन ही घटना मध्यरात्री घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
24 तासातील दुसरी घटना
24 तासांत वाहनातून मृतदेह सापडण्याची ही दुसरी घटना आहे.यापूर्वी वसईत जळालेल्या कारमध्ये मृतदेह सापडला होता. ही घटना ताजी असतानाच आता मावळच्या घटनेने गूढ वाढले आहे. दरम्यान, वसईत जळालेल्या कारमध्ये सापडलेला मृतदेह हा शूटिंगसाठी वापरण्यात आलेल्या मालमत्तेचा भाग असल्याचे तपासात समोर आले आहे. आता मावळच्या या घटनेचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
लोणावळ्यातदेखील आढळला होता मृतदेह
दिल्लीहून लोणावळ्यात फिरायला आलेल्या तरुणाता मृतदेह काही दिवसांपुर्वीच लोणवळ्याच्या जंगलात सापडला होता. हा तरुण लोणावळ्याच्या जंगलात फिरत असताना वाट चुकला. त्यानंतर दोन दिवस त्याच्यासोबत काहीच संपर्क होत नव्हता. मात्र लोणावळा पोलीस आणि काही स्वयंसेवी संघटनांनी शोधमोहिम सुरु केली होती. अखेर तीन दिवसांनी त्यांच्या मृतदेह पोलिसांना सापडला होता.