पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अखेर सुरु झाला आहे. जवळपास साडेसहा तासांनी एक्स्प्रेस वे सुरु झाला आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांनी तळेगावजवळच्या उर्से टोलनाक्यावर सकाळी साडेदहा वाजल्यापासून रास्तारोको केला होता. परिणामी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन्ही मार्गाची वाहतूक दोन्ही दिशेने ठप्प झाली होती.
महाराष्ट्र बंदमुळे आज वाहनांची संख्या कमी असल्याने वाहतूक कोंडी कमी प्रमाणात होती. परंतु दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. पोलिस दिवसभर आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर साडेसहा तासांनंतर म्हणजेच पाचच्या सुमारास एक्स्प्रेस वे सुरु झाला.
क्रांती दिनाचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांनी बंद पुकारला आहे.
'महाराष्ट्र बंद'साठी सकल मराठा समाजाची आचारसंहिता
- बंद हा शांततेच्या मार्गाने असला पाहिजे
- कोणत्याही शासकीय वा खाजगी मालमतेची तोडफोड अथवा मोडतोड करु नये
- मराठा समाजाने आपापले विभाग कडकडीत बंद करायचे
- कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे आपली जबाबदारी आहे
- पोलिस प्रशासनला सहकार्य करा
- बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत
- अफवांवर विश्वास ठेवू नका
- मराठा सेवकांनी शांत राहून अॅक्शन प्लॅन तयार करायचा आहे
- बंद असा करायचा की पुढच्या वर्षी फक्त क्रांती दिन नाही तर "मराठा क्रांती दिन" असं नमूद केलं पाहिजे
नवी मुंबई, ठाण्यात बंद नाही
आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये मुंबईचा समावेश असला, तरी नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा समाज सहभागी होणार नाही. मराठा समाज समन्वयक आणि पोलिसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार नागरिकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं सांगून नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा संघटनांनी बंदमधून माघार घेतली आहे. या ठिकाणी बंदऐवजी ठिय्या करुन निषेध नोंदवला जाणार आहे.
अनेक शाळांना सुट्टी
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील अनेक शाळांनी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वीच शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुट्टीचा निर्णय मुख्याध्यापकांकडे सोपवला होता. यानुसार काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी हा निर्णय घेतला आहे.
मात्र आजच्या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळं दूध आणि वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरु राहतील.
मराठा आंदोलकांच्या मागण्या
मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगा भरती स्थगित करावी, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागण्यात मराठा आंदोलकांच्या आहेत. त्यापैकी मेगा भरती स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑगस्ट रोजी केली.