पिंपरी चिंचवड : कांद्याचे दर 30 ते 35 रुपये प्रति किलोच्या घरात पोहचले असताना लोणावळ्यातील नागरिकांना कांद्यारुपी दिवाळीचा बोनस मिळाला. पण या बोनसमधून माणुसकी संपल्याचं दर्शन घडलं. अपघातग्रस्त कांद्याच्या ट्रकला मदत करण्याऐवजी नागरिकांनी कांद्यावर डल्ला मारला.


मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कांद्याचा ट्रक पुलावरुन खाली कोसळला. यावेळी नागरिकांनी पोत्यात भरुन हा कांदा पळवला. पुण्याहून मुंबईच्या दिशेला जाताना वळणावर हा अपघात झाला. क्षमतेपेक्षा जास्त कांदा असल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक कठड्याला धडकून तीस फूट खाली कोसळला.

अपघातात जखमी झालेल्या चालकाला आणि ट्रक हटवण्यास मदत करण्याऐवजी नागरिकांनी मात्र कांद्यावर हात साफ केला. एक-दोन किलो नव्हे तर पोतं भरुन, तेही दुचाकीवरुन नागरिकांनी कांदा घरी नेला.

दिवाळी तीन दिवसांवर येऊन ठेपली असताना कांदा ग्राहकांना रडवू लागला आहे. 30 ते 35 रुपये प्रति किलो कांदा झाला असताना या अपघाताच्या निमित्ताने लोणावळयातील नागरिकांना हा बोनस मिळाला. पण अपघाताची परिस्थिती पाहता, मदतीऐवजी कांदा पळवण्याला प्राधान्य दिलं गेल्याने, माणुसकी संपल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं.