पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रिकेट खेळून सीएम चषक स्पर्धेचं उद्घाटन केले. भाजप आमदार योगेश टिळेकरांनी केलेल्या गोलंदाजीवर मुख्यमंत्र्यांनी फलंदाजी केली. इतर वेळी सभांच्या मैदानात 'बोलंदाजी' करणाऱ्या फडणवीसांना फलंदाजी करताना पाहून उपस्थितही अवाक झाले.


टिळेकरांनी टाकलेले पहिले दोन बॉल मुख्यमंत्र्यांकडून हुकले. टिळेकरांनी तिसरा बॉल फुलटॉस टाकला. सुरुवातीचे दोन बॉल राईटी खेळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तिसरा चेंडू मात्र डावखुरी फलंदाजी करत टोलवला.

भारतीय जनता युवा मोर्चाकडून आयोजित सीएम चषक स्पर्धेचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. स्वामी विवेकानंद जयंती म्हणेजच 12 जानेवारी 2019 पर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावांमध्ये सीएम चषकच्या निमित्ताने खेळ होणार आहेत.

महाराष्ट्रात ऑलिम्पिक विजेते खेळाडू निर्माण होत असल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. व्यसनाधीनतेला दूर ठेवण्यासाठी तरुण पिढीने खेळांकडे वळणं आवश्यक असल्याचं मतही यावेळी फडणवीसांनी मांडलं.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग हडपसरपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आमदार योगेश टिळेकर यांनी मला हडपसरसाठी गळ घातली. त्यांच्या विनंतीला मान देऊन मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा मार्ग घेतल्याचं फडणवीस म्हणाले.