पुणे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. ही अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने काही महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. ऑरेंज आणि ग्रीन झोनमधल्या उद्योगांना आजपासून सुरु करण्यास अंशत: परवानगी देण्यात आली आहे. रेड झोनमधले निर्बंध मात्र कायम आहेत. असं असलं तरी राज्यातील आयटी क्षेत्रातील कंपन्यांना आजपासून 50 टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्यास परवानगी दिली आहे. मात्र पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील एकही कंपनी आज सुरु झालेली नाही. शहरातील इतर ठिकाणी असलेल्या आयटी कंपन्याही आज बंदच राहिल्या.


या आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राहतात आणि ही दोन्ही शहरं रेड झोनमध्ये मोडत असल्याने या शहरांमधून कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आयटी उद्योग पुढील काही दिवस बंदच राहणार हे स्पष्ट झालं आहे.


पुणे, पिंपरी चिंचवड शहरात कर्फ्यू
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण पुणे शहर मध्यरात्रीपासून बंद करण्यात आलं आहे. पुढील सात दिवसात शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. संपूर्ण पुणे महापालिकेचे क्षेत्र, पिंपरी चिंचवड महापालिकेचे क्षेत्र, संपूर्ण हवेली तालुका, शिरुर आणि वेल्हे तालुक्यांचा काही भाग आणि बारामती नगर परिषदेची संपूर्ण हद्द संक्रमणशील क्षेत्र (contempt zone) म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. हे संक्रमणशील क्षेत्र 27 एप्रिलपर्यंत सील करण्यात आलं आहे. या क्षेत्रातील कोणाही व्यक्तीला बाहेर जाता येणार नाही आणि बाहेरच्या भागात राहणाऱ्या कोणा व्यक्तीलाही या परिसरात येता येणार नाही.


Curfew In Pune | पुणे, पिंपरी चिंचवड सील; हवेली तालुका, बारामती नगरपरिषद हद्दही सील


दोन अटींमुळे कर्मचाऱ्यांची कंपन्यांमध्ये येण्यास अडचण
हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये 250 हून अधिक कंपन्या आहेत. इथे काम करणारे कर्मचारी पुणे किंवा पिंपरी चिंचवड इथे राहतात. पुणे आणि पिंपरी चिंचवड रेड झोन घोषित केल्यामुळे या शहरातून कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी कंपनीत येऊ शकत नाही. त्यामुळे या कंपन्या अजूनही बंद आहेत. सुरक्षारक्षक सोडला तर कोणीही उपस्थित नाही. हिंजवडीचा आयटी पार्क हा एरव्ही कर्मचाऱ्यांनी गजबजलेला असतो. सरकारने आयटी कंपन्यांना पन्नास टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्याची परवानगी दिली असली तरी त्यासाठी दोन अटी घातल्या आहेत. पहिली अट म्हणजे रेड झोनमधले अर्थात हॉटस्पॉटमधील कर्मचारी कंपन्यांमध्ये येणार नाही. दुसरी अट म्हणजे रेड झोन वगळता इतर ठिकाणाहून जरी काही कर्मचारी या कंपन्यांमध्ये आले त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था या कंपनीनी कॅम्पसमध्येच करावी लागणार आहे. या दोन अटींमुळे कर्मचारी त्यांच्या कंपन्यांपर्यंत पोहोचणं अवघड बनलं आहे. त्यामुळे आयटी पार्कमध्ये सध्या इथे शुकशुकाट आहे.


पुण्यातील आयटी क्षेत्र शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुणे बदललं त्यात या आयटी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. मात्र या आयटी क्षेत्रावर लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला आहे आणि भविष्यात त्याचा परिणाम पुण्यावरही होण्याची शक्यता आहे.


Lockdown 2 | पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये शुकशुकाट