Sharad Pawar Steps Down as NCP Chief: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्ष पदावरुन निवृत्त झाल्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण अशा चर्चा सुरु आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी शरद पवार यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत अध्यक्ष पदावरुन निवृत्त होऊ नये. त्यांनी त्यांच्या जोडीला किंवा त्यांचं काम पाहण्यासाठी कार्याध्यक्ष नेमावा, असं मत अंकुश काकडे यांनी व्यक्त केलं आहे. 


राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण किंवा राष्ट्रवादीच्या पुढच्या वाटचालीवर चर्चा होत आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदावरुन निवृत्त होऊ नये, असं अनेक राष्ट्रावादीच्या नेत्यांची इच्छा आहे. मात्र त्यांच्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी दोन नावांची चर्चा आहे. प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे या दोन नावांची चर्चा आहे. मात्र सुप्रिया सुळे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


अंकुश काकडे म्हणाले की, कालच्या शरद पवार यांच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी नेमलेली राष्ट्रवादीची समिती बैठक घेणार आहे. या बैठकीत निर्णय होणार की, नाही यासंदर्भात ठोस माहिती नाही मात्र विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राष्ट्रवादीचे बाकी प्रांताध्यक्षांनीदेखील शरद पवारांची भेट घेतली आहे. अनेकांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची इच्छा असल्याचं ते म्हणाले. 


पुण्यातील राष्ट्रवादी भवनालाही फुटला हुंदका 


शरद पवार यांचा निर्णय ऐकून शेकडो कार्यकर्ते पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात जमा झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. ही बातमी कळताच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. शरद पवार यांना साकडे घालण्यासाठी राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यकर्ते जमा झाले. राष्ट्रवादी काँग्रेस हा एक परिवार आहे. पवारसाहेब हे घरातील वडीलधारे कर्ते आहेत. घरातील वडीलधारे कधीही रिटायर होऊ शकत नाही. त्यामुळे साहेब निर्णय बदलत देत नाही तोपर्यंत आम्हीही सर्वजन राजीनाम्यावर ठाम आहोत, असं मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं. सगळ्याच कार्यकर्त्यांना यावेळी भावना अनावर झाल्या होत्या. अश्रूही आवरत नव्हते. राजीनामा मागे घ्या, अशा घोषणा पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर देण्यात आल्या.