chinchwad bypoll election: चिंचवडचे(chinchwad bypoll election:) दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक होत आहे. लक्ष्मण जगतापांच्या पत्नी की त्यांचे बंधू यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळेच अद्याप भाजपने उमेदवारी जाहीर केली नाहीये. असं असतानाच आज लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगतापांनी (Ashwini jagtap) एक पाऊल पुढं टाकलं आणि उमेदवारी अर्ज घेत, उमेदवारीवर दावा केला. त्यानंतर भाजपच्या त्याच अधिकृत उमेदवार असतील अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. त्याचवेळी दिवंगत लक्ष्मण जगतापांचे लहान बंधू शंकर जगतापांनी (Shankar Jagtap) भाजपसाठीच उमेदवारी अर्ज घेतल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत यादीत शंकर जगतापांचे नाव आलेच नाही. जगताप कुटुंबातून एकाच उमेदवाराचे नाव निवडणुकीसाठी समोर येईल अशी अपेक्षा होती. पण दोघांनी ही उमेदवारीवर दावा ठोकल्याने जगताप कुटुंबातील वादाचा पहिला अंक जाहीरपणे समोर आला असल्याची चर्चा आहे.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारीच (28 फेब्रुवारी) जगताप कुटुंबियांशी बंद दाराआड चर्चा केली. ही भेट सांत्वनपर होती असं शंकर जगतापांनी स्पष्ट केलं होतं. पण फडणवीस हे दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या पत्नी आणि भावातील वाद मिटविण्यासाठीच आले होते, अशी चर्चा सर्वत्र रंगली होती.


त्यावेळी शंकर जगताप म्हणाले होते की, लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर शोक सभा झाली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना घरी यायचं होतं. कुटुंबियांची भेट घ्यायची होती. त्यांनी त्यासंदर्भात माहितीदेखील दिली होती. त्यानुसार त्यांनी आमची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पोटनिवडणुकी संदर्भातदेखील कोणतीही चर्चा झाली नाही, असं सांगण्यात आलं होतं. फडणवीसांनी लक्ष्मण जगताप यांच्याबरोबरच्या आठवणी सांगितल्या. लक्ष्मण जगताप यांच्या कामाचं कौतुक केलं. त्यांनी एखादं काम हाती घेतलं ही पूर्ण करायचे, असं म्हणत देवेंद्र फडवीसांनी जगताप यांंच्या कामाची पद्धत सांगितली होती. त्यामुळे बंद दारामागे काहीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं शंकर जगताप यांनी स्पष्ट केलं होतं.  


महाविकास आघाडीतही आलबेल नाही
भाजपचा हा तिढा सुरू असताना महाविकास आघाडीत देखील काही आलबेल नसल्याचंच चित्र आहे. चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसनं, शिवसेनेनं की अन्य कोणी याचं ही घोंगडं भिजत आहे. अशा परिस्थितीत विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी इच्छुकांशी बैठक घेतली तर उमेदवारी जाहीर करण्याआधीच नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज घेत चर्चांना उधाण आलं. त्यात आता उद्या (3 फेब्रुवारी) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची  दोन्ही मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारीसंदर्भात चर्चा होणार आहे. या बैठकीला उपनेत्या नीलम गोऱ्हे आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण असेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.