पुणे : महाराष्ट्राचे सुपूत्र पुण्यातील शहीद लान्सनायक सौरभ फराटे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. काल रात्री सौरभ यांचं पार्थिव पुण्यात दाखल झालं. पुण्यातील एएफएमसी अर्थातच आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये फराटेंचं पार्थिव ठेवण्यात आलं.


काल पुण्याचे महापौर आणि लष्करी जवानांनी शहीद लान्सनायक सौरभ फराटे यांना श्रद्धांजली अर्पण केली. शनिवारी जम्मू काश्मीरमधल्या पम्पोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लान्सनायक सौरभ फराटे शहीद झाले. गेली 13 वर्षं सौरभ फराटे यांनी भारतीय सैन्यदलाची सेवा केली. आज फराटेंचं पार्थिव त्यांच्या मूळगावी नेण्यात आलं. आज फुरसुंगीमध्ये त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सौरभच्या पश्चात त्याची आई, वडील, पत्नी आणि दोन जुळ्या मुली असा परिवार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल फराटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.