पिंपरी चिंचवड : लोणावळ्याजवळ मंकी हिलमुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या मार्गात विघ्न निर्माण झालं आहे. हुबळी एक्स्प्रेसवर पहाटे साडे पाच ते सहाच्या सुमारास दरड कोसळली. या घटनेत तीन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कल्याणमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


लोणावळा आणि खंडाळा स्टेशनदरम्यान मंकी हिलजवळ दरड कोसळल्याने हुबली-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसवर भलामोठा दगड आदळला. छप्पर फुटून हा दगड थेट स्लीपर डब्ब्यात पडल्याने इथे झोपलेले तीन प्रवासी जखमी झाले.

दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तर या मार्गावरील रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरड कोसळल्याने हुबळी एक्सप्रेस एक तास उशिराने धावत आहे. दिलासादायक बाब म्हणजे इतर रेल्वेवर या घटनेचा परिणाम झालेला नाही. मात्र मुंबईहून निघालेली इंद्रायणी एक्सप्रेस ही अतिवृष्टीमुळे काही काळ उशिरा धावत आहे.

विशेष म्हणजे मुंबई-पुणे रेल्वे मार्गामध्ये अडचण निर्माण होण्याची महिनाभरातील चौथी घटना आहे. 22 जुलै रोजी मंकी हिलजवळ रेल्वे रुळ खचल्याने मुंबईहून कोल्हापूरला जाणारी कोयना एक्स्प्रेस खोळंबली होती.



तर 19 जुलै रोजी मुंबईकडे येणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेससमोर काही मोठे दगड आल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या होत्या.

18 जुलै रोजी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या हैदराबाद एक्स्प्रेसचं इंजिन रुळावरून घसरलं आणि त्यानंतर थोड्याच वेळानंतर त्याच मार्गावर छोटे दगड कोसळले. यामुळे चार तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

यापूर्वी, 30 जानेवारी रोजी याच ठिकाणी रेल्वे रुळावर दरड कोसळून एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. तर तीन कर्मचारी जखमी झाले होते. सुदैवाने यावेळी कुठलीही रेल्वे तिथून पास होत नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण या घटनेनंतर रेल्वे वाहतूक सुमारे एक तास बंद होती.

संबंधित बातमी

मंकी हिलजवळ रेल्वे ट्रॅक खचला, कोयना एक्स्प्रेस एक तास खोळंबली