पुणे : ललित पाटील 2020 पासून येरवडा कारागृहात (Sasoon Hospital Drug Racket) फक्त नावापुरताच कैद होता. कारण ललित पाटीलचे याच काळातील अतिशय धक्कादायक फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. यातील काही फोटोंमध्ये ससूनमधील कैद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्डमध्ये बसून ललित पाटील चक्क सिगारेट ओढताना दिसतो आहे. तर इतर फोटोंमध्ये ललित पाटील हा प्रेयसी प्रज्ञा कांबळेसोबत पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये मौजमजा करताना दिसतो आहे. एवढंच काय मॉलमध्ये खरेदी करतानाही तो दिसतो आहे. पुणे पोलिसांनी ललित पाटीलला ड्रग रॅकेट चालवण्यात साथ दिल्याबद्दल प्रज्ञा कांबळे आणि ललितची दुसरी मैत्रीण अर्चना निकम या दोघीना अटक केली आहे. ललित पाटीलच्या या सगळ्या टोळीच्या विरुद्ध मोक्का कायदा लावण्याच्या तयारीत पुणे पोलीस आहेत.
कधी सिगारेट तर कधी मैत्रिणीच्या कुशीत....
कधी तोंडात सिगारेट, तर कधी पंचतारांकित हॉटेलमध्ये मैत्रिणीच्या बाहुपाशात मौजमजा असा ललित पाटीलचा तुरुंगवास हा सुरु होता. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या फोटोंमधून हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ललित पाटील चक्का एका फोटोत ससून रुग्णालयाच्या 16 नंबर वॉर्डमध्ये सिगारेट ओढताना दिसतो आहे. त्यामुळं ससून हॉस्पिटलचं व्यवस्थापन ललितचा कसा पाहुणचार करत होतं हे यातून सिद्ध होत आहे. तर बाकी काही फोटो पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमधील आहेत. या फोटोंमध्ये ललित पाटील त्याची मैत्रीण प्रज्ञा कांबळे हिच्या बाहुपाशात दिसत आहे. तर काही फोटोंमध्ये ललित पाटील या हॉटेलमध्ये निवांत दिसत आहे. यातील ललित पाटीलचे काही फोटो तर चक्क मॉलमधील आहेत.
ललित पाटीलचा रंगीत-संगीत तुरुंगवास
ललित पाटीलचे हे सगळे फोटो काही महिन्यापूर्वीचे आहेत. याच महिन्यांमध्ये ललित पाटील उपचारांसाठी ससून रुग्णालयात भरती होता. कैद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्डमध्ये बंद असलेल्या ललितकडे दोन आयफोन होते. या फोनवरून तो ड्रग रॅकेट तर चालवायचाच त्याचबरोबर मैत्रीणींशी तो चॅटिंग देखील करायचा. त्या चॅटिंग दरम्यान फोटोही शेअर केले जायचे.अनेकदा ललित 16 नंबर वॉर्डमधून ससून रुग्णालयाच्या जवळच असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाला जायचा. तर कधी शॉपिंगसाठी मॉलमध्ये फेरी मारायचा, हे सगळं या फोटोच्या माध्यमातून समोर आलं आहे. तरुणाईला ड्रगच्या विळख्यात अडकवणाऱ्या ललिताचा स्वतः मात्र असा रंगीत-संगीत तुरुंगवास सुरु होता.
ललित पाटीलने ससून रुग्णालयातून पळाला नाही तर त्याला पळवून लावण्यात आलं, असा दावा एबीपी माझाच्या कॅमेऱ्यासमोर केला आहे. तो खरा असण्याची शक्यता आहे. कारण तो पकडला गेला असता तर अनेकांच बिंग फुटणार होतं. मेफेड्रोनच्या विक्रीतून कोट्यवधी रुपये कमावणारा ललित ससूनच व्यवस्थापन, येरवडा कारागृहातील अधिकारी आणि बंदोबस्तावरील पोलीस यांच्यावर लाखों रुपये खर्च करत होता. त्यातून त्याला हवं - नको ते सगळं त्याच्यासमोर हजर होत होतं.
मेफेड्रोनच्या विक्रीतून येणारे पैसे ललित पाटील प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या त्याच्या दोन मैत्रिणींवर खर्च करत होता. ससून रुग्णालयातून निसटल्यानंतर ललित नाशिकला जाऊन आधी या दोघींना भेटला आणि त्यानंतर गुजरातला पसार झाला. त्यानंतर तो सतत या दोघींच्या संपर्कतं होता आणि या दोघी त्याला पळून जाण्यासाठी मदत करत होत्या हे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी दोघीनांही अटक केली आहे.
प्रज्ञा कांबळे ललित पाटीलची गर्लफ्रेंड?
प्रज्ञा कांबळे ही व्यवसायाने वकील आहे. ललित पाटील आणि त्याची टोळी कुठल्या गुन्ह्यात पकडली गेलीच तर त्यांना जामिनावर बाहेर काढण्याची जबाबदारी प्रज्ञा कांबळेवर असायची. ललित पाटीलची आधी दोन लग्न झाली आहेत, हे माहीत असताना देखील प्रज्ञा कांबळे त्याची गर्लफ्रेंड बनली. अनेकदा येरवडा कारागृहातील कर्मचाऱ्यांना फितवून त्यांच्या मोबइलवरून दोघांचं बोलणं व्हायचं आणि ड्रग रॅकेटची पुढची दिशा ते दोघं ठरवायचे.
ललित पाटीलची हे सगळे फोटो पुणे पोलीस आणि ससूनच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या टोळीवर मकोका कायद्याअंतर्गत करावी करण्याची तयारी चालवली असली तरी त्याला त्याच्या अशा रंगेलपणामध्ये साथ देणारे ससूनच्या व्यवस्थापनातले अधीकारी आणि पोलीस अधिकारी देखील तेवढेच दोषी आहेत. त्यामुळं त्यांच्यावर देखील मकोकाअंतर्गत कारवाई करण्याची गरज आहे.
आता यंत्रणांच्या साफसफाईची संधी...
ललित पाटीलचे हे फोटो महाराष्ट्रातील तुरुंगाचं वास्तव मांडणारे आहेत. पैसे असतील तर तुरुंगात सर्व काही मिळतं हे सामान्यांच्या तोंडी असलेल्या वाक्याला आणखी बळ देणारे आहेत. खरं तर ललित पाटीलमुळे वर्षानुवर्षं सुरु असलेले अनेकांचे काळे धंदे समोर आले आहेत. त्यामुळं एखाद्या दुसऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई चालणार नाही तर ललित सारखा गुन्हेगार कायद्याला अशाप्रकारे वाकुल्या दाखवू शकणार नाही. यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. ललित पाटील प्रकरणाने खरं तर या यंत्रणांच्या साफसफाईची संधी चालून आली आहे.
इतर महत्वाची माहिती-