पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. तर कोथरूडमध्ये एका तरूणाला गुंड गजा मारणेच्या गुडांनी मारहाण केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे कोथरूडमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यासंदर्भात कोथरूड परिसरात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. पोस्टरच्या माध्यमातून कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
काय लिहलंय बॅनरवरती?
मा. मुख्यमंत्री, यांना पत्र कोथरूड च बीड होण्यापासून वाचवा, आमचं कोथरूड असं नव्हतं..!
* गुन्हेगारांना अभय कोण देत ?
* त्यांना पैसा कोण पुरवत, पोशिंदा कोण ?
* पोलिसांवर कोणाचा दवाव आहे का ?
* गुन्हेगारी प्रवृत्त करणाऱ्या रिल्स कोण पसरवत ?
* छोटे मोठे व्यावसायिकांची मुस्कट दाबी कोण करत ?
* गुन्हेगारांना राजकीय अभय नको ?
* गुन्हेगारांना रस्ता अडवून, कर्कश व नियमबाह्य साउंड लावून उन्माद माजवायला स्पॉन्सरशिप कोण करत अश्या प्रकारे गुन्हेगारांना संघटीत होण्यास कोण प्रवृत्त करत ?
* गुन्हेगारी वृत्तीचे लोक वर्गणीच्या नावाखाली पोळक्याने खंडणी मागतात कारवाई कोण करणार ?
* गुन्हे नोंद असणाऱ्या गुन्हेगारांचे अनधिकृत फ्लेक्स बॅनरवर चमकोगिरी वर का कारवाई होत नाही ?
* कोथरूड मध्ये सतत होणाऱ्या चोऱ्या, खून, हाणामाऱ्या याला जबाबदार कोण ?
जाहीर निषेध
याला जबाबदार कोण ? (टिप - ह्या संदेश मागे कोणाचाही राजकीय द्वेष भावना नाही, ही खरी परिस्थिती आहे)
समस्त गावकरी कोथरूड व त्रस्त नागरिक
"गुन्हेगारांना कोण अभय देतंय?"
"गुन्हेगारांना कोण अभय देतंय?" असा सवाल विचारला जात आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे रिल्स कोण व्हायरल करतंय? असंही विचारलं जात आहे. व्यवसायिकांची मुस्काटदाबी, वर्गणीच्या नावाखाली खंडणी, गुन्हेगारांचे फ्लेक्स लावून चमकोगिरी करणं, आणि सततच्या चोऱ्या, खून हाणामाऱ्या यासाठी कोण जबाबदार आहे, असा संतप्त सवाल कोथरूडकरांनी विचारला आहे. गेली काही दिवस पुण्यात गुंडांनी उच्छाद मांडला आहे. भररस्त्यावर रिव्हॉल्व्हर काढून हाणामारी करणं, असा प्रकार दिसत आहेत. यामुळे पुणेकरांनी थेट चौकात बॅनर लावून आपली चिंता व्यक्त केली आहे. "कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा," असं बॅनर त्रस्त नागरिकांनी कोथरूडमध्ये लावले आहे.
आयटी इंजिनियर देवेंद्र जोग या तरूणाला मारहाण
कोथरूड परिसरामध्ये गाडीला धक्का लागल्यामुळे वाद झाला आणि त्यातून आयटी इंजिनियर देवेंद्र जोग या तरूणाला गजा मारणेच्या गुंडांकडून मारहाण केली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. जर केंद्रीय मंत्री महोदयांचे निकटवर्तीय देखील सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांचा काय? असा सवाल आता पुणेकर विचारत आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे आणि त्यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. विरोधकही या प्रकरणांवरून सरकारला धारेवर धरत आहेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुणेकर विचारत आहेत, "आता पुण्यात गुंडगिरी मोडून कोण काढणार?" कारण पुण्यातील घडलेल्या अतिगंभीर गुन्ह्यांनी शहराला हादरवून सोडलं आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन होतं आहे, ज्यामुळे खाकीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.