पुणे: पुण्यामध्ये अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची पार्टी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यांनी सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर) वरती काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी पुण्यातील खेडमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पार्टी रंगली, आणि त्यात उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे डान्स करत सहभागी झाले असं म्हटलं होतं. त्यावरती खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी खुलासा केला आहे. खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी खुलासा करत विधानसभा निवडणूकीत चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक व्हावं, या अनुषंगाने या पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी सर्वांनी हा आनंद व्यक्त केला असल्याचा खुलासा प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी केला आहे.
प्रांताधिकारी अनिल दौंडे काय म्हणालेत?
विधानसभा निवडणूक 2024 मतमोजणी झाल्यानंतर खेड विधानसभा मतदारसंघातील सर्व निवडणूक प्रक्रिया सुलभ आणि शांततेत पार पडल्यानंतर त्यानिमित्त सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्याने आणि त्यांच्या कामासाठी शाब्बासकीची थाप देण्यासाठी एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण त्या हिरवळीवर जमले होते. सर्व वेगवेगळ्या विभागाच्यांना प्रमाणपत्र वितरण करून त्यांचा सन्मान केला. त्यांना प्रोत्साहन दिलं त्यानंतर एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये प्रशासनातील सर्व विभागातील जमलेले होते. सदर कार्यक्रमाच्या दरम्यान एक संस्कृती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्यामध्ये वेगवेगळे कलागुण कर्मचारी अधिकारी दाखवत होते. त्यानुसार तो कार्यक्रम पार पडला त्यानंतर शेवटी सर्वांनी आनंद व्यक्त करण्यासाठी डान्स केला.
ते रिसॉर्ट अनधिकृत असून देखील त्या ठिकाणी कार्यक्रम केला या आरोपांवर उत्तर देताना प्रांताधिकारी अनिल दौंडे म्हणाले, त्या ठिकाणी जे बांधकाम आहे, त्यावर महसूल विभागामार्फत काही बिनशर्त आकारणी दंड आहे, तो दंड एकूण बारा लाख 48 हजार 2024 सालचा आहे, तो वसूल करण्यात आलेला आहे आणि बांधकामाच्या बाबतीत त्यांना पीएमआरडी कडून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. त्यामुळे आम्ही त्या कोणत्याही इमारतीचा वापर केलेला नाही. आम्ही त्या हिरवळीवर एकत्र जमलो आणि भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, अशी माहिती यावेळी प्रांत अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालं असेल तर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. त्या रिसॉर्टच्या काही बांधकाम अनाधिकृत रित्या बांधलेले आहे, याची आम्हाला काहीही कल्पना नव्हती. हा कार्यक्रम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर 3 डिसेंबर रोजी पार पडलेला आहे अशी माहिती यावेळी खेड राजगुरुनगरचे प्रांत अधिकारी यांनी दिली आहे.