पुणे : कोरेगाव-भीमा शौर्यदिनानिमित्त आज विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम पार पडत आहे. आजचा कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर देशभरातून भीमसागर याठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत. राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच याठिकाणी उपस्थित राहून विजयस्थंभाला अभिवादन केलं आहे. आज अनेक मोठे नेते याठिकाणी येणार आहेत. यामध्ये नवनिर्वाचित मंत्री नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा समावेश आहे. याशिवाय स्थानिक आमदार, खासदार हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
कोरेगाव-भीमा अभिवादन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय सोशल मीडियावरही पोलिसांची करडी नजर असणार आहे.
कोरेगाव भीमा शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांकडून 250 व्हॉट्सअॅप ग्रुप्सना नोटीसा बजावल्या आहेत. याशिवाय पोलीसांकडून 744 जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. फेसबुकवरून 12 पेजेस डिलीट करण्यात आलेत. महसूल प्रशासनाने ही मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यान्वयित केली आहे.
आज परिसरातील शाळा, कॉलेजेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. तसेच आठवडा बाजारही बंद राहणार आहे. पुणे-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पार्किंगसाठी 15 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. विजस्तंभावर जाण्यासाठी बसेसची सुविधा करण्यात आली आहे. 400 वरिष्ठ अधिकारी आणि 10 हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर पोलिस सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.