पुणे : शहरात तयार होणारं अन्न वाया न घालवता ते गरजूंच्या मुखी जावं, यासाठी पुण्यात रॉबिनहूड आर्मीनं मोहीम सुरु केली. त्यांच्या कामाला 'खाऊची बाराखडी' या उत्साही महिलांच्या गटाचं बळ मिळलं आहे. या महिला गटाने आज तब्बल एक हजार मुलांसाठी बिर्याणी बनवून रॉबिनहूड आर्मीकडे सुपूर्द केली आहे.


शहरातली हॉटेल्स, खानावळी किंवा पार्टी लॉन्स इथे तयार झालेलं, पण शिल्लक राहिलेलं अन्न रॉबिनहूड आर्मी गोळा करुन गरजूंपर्यंत पोहचवते. यात ही आर्मी शिळं, खरकटं अन्न घेत नाही. त्यांच्या या मोहिमेला हातभार लागावा या उद्देशाने 'खाऊची बाराखडी' या समुहानं पुढाकार घेतला.

गरीब मुलांना ताजं आणि सकस अन्न मिळावं, या विचारानं या महिला समुहानं हजार मुलांसाठी बिर्याणीचा बेत केला. त्यासाठी 80 किलो बासमती तांदूळ, भाज्या अशी खरेदी केली. आणि हजार मुलांना पुरेल इतकी बिर्याणी तयार केली. ही बिर्याण गरीब मुलांना देण्यासाठी रॉबिनहूड आर्मीकडे सुपूर्द करण्यात आली.

वास्तविक, पुण्यात पन्नासपेक्षा जास्त स्वयंसेवक रॉबिनहूड आर्मीचं काम करतात. उपाशी मुलांना आणि नागरिकांना तसंच झोपायला लागू नये, यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. त्यांचा हा उपक्रम पाहून खाऊची बाराखडी या महिलांच्या ग्रुपनं रॉबिनहूड आर्मी बरोबर काम करण्यासाठीचं पहिलं पाऊल उचललं आहे.

त्यामुळे गरजूंना दोन घास भरवणारे असे हात सगळीकडेच पुढे आले तर कुणालाच भुकेल्या पोटी झोपावं लागणार नाही, अशी अपेक्षा.