पिंपरी चिंचवड : भर दिवसा रस्त्यावरून नंग्या तलवारी नाचवत दुकानात प्रवेश करत दोघांवर तीन तरुणांनी जीवघेणा हल्ला केला. पिंपरी चिंचवडच्या पुनावळेत गुरुवारच्या दुपारी पाच वाजता घडलेली ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

जगदंबा सुपर मार्केट या दुकान मालकाने हफ्ता न दिल्याचा राग मनात धरत हा हल्ला केल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्यात पुनाराम देवासी आणि विकास हे मामा-भाचे गंभीर जखमी झाले आहेत.

हल्ल्यापूर्वी हल्लेखोर हातात तलवारी घेऊन दुकानालगतच्या गल्लीतून येताना आणि दुकानात घुसून हल्ला करताना स्पष्ट दिसत आहेत.

एक महिला वगळता अगदी त्या गल्लीपासून हल्ला करून पळ काढेपर्यंत त्यांना कोणीच रोखण्याचा प्रयत्न केला नाही. वेळीच त्या महिलेनं दुकानात प्रवेश करून हल्लेखोरांना रोखलं अन्यथा मामा-भाचे बचावले नसते.

या घटनेमुळं परिसरात बराच काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आता या सीसीटीव्हीच्या आधारे हिंजवडी पोलिसांनी अतिश रास्ते सह तिघांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्या तिघांचा शोध सुरु आहे.