पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा मुलगा जय पवार (Jay Pawar) यांचं येत्या आठवड्यात लग्नसोहळ्याचं पर्व बहरीनमध्ये रंगणार आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा ४, ५ आणि ७ डिसेंबर रोजी बहरीनमध्ये पार पडणार असून या समारंभासाठी पवार–पाटील कुटुंबीयांकडून केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.
लग्न समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त दोनच नेते निमंत्रित असल्याची माहिती समोर आली आहे. यात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे. पवार कुटुंबीयांचा मोठा सोहळा असला तरी निमंत्रितांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे.
जय पवार यांच्या लग्नाची पत्रिका एबीपी माझाच्या हाती लागली असून त्यानुसार बहरीनमध्ये चार दिवसांचे पारंपारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.४ डिसेंबर – मेहेंदी५ डिसेंबर – हळदी, वरात आणि मुख्य लग्नसोहळा६ डिसेंबर – संगीत७ डिसेंबर – स्वागत समारंभ
या विवाह सोहळ्यासाठी मागील काही दिवसांपासून पवार–पाटील कुटुंबीयांची आणि पाहुण्यांची तयारी जोरात सुरू असून संपूर्ण कार्यक्रम परदेशात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
Yugendra Pawar: नुकताच पार पडला युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा भव्य विवाह सोहळा
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) युवा नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आणि तनिष्का कुलकर्णी (Tanishka Kulkarni) यांचा भव्य विवाह सोहळा (३० नोव्हेंबर) रोजी मुंबईतील बीकेसी येथील जिओ सेंटर येथे संपन्न झाला. युगेंद्र यांच्या विवाह सोहळ्याला पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. या सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. युगेंद्र-तनिष्का यांचा विवाह हा सोहळा अत्यंत भव्य आणि दिमाखदार पद्धतीने पार पडला.