पुणे : "प्रत्येकाने आपल्या धार्मिक भावना अंत:करणात ठेवाव्यात, घरात ठेवाव्यात. धार्मिक भावनांचं जाहीर प्रदर्शन करु नये. त्याच्या आधारावर अन्य घटकांच्या संबंधी एकप्रकारचा द्वेष निर्माण होऊन त्याचा परिणाम समाजावर दिसू लागतात. महाराष्ट्रात असं वातावरण कधीच नव्हतं," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. तसंच मुख्यमंत्र्यांचं एकेरी नाव घेऊन वेडंवाकडं बोलणं शोभत नाही, असंही पवार यांनी म्हटलं.
 
शरद पवार म्हणाले की, "अलिकडच्या काळात राज्यात व्यक्तिगत गोष्टी होत आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात सत्ताधारी-विरोधक यांच्यावरील टीका ही भाषणापुरती मर्यादित होती. ही परंपरा यशवंत चव्हाण यांच्यापासून सुरु होती. विधीमंडळात अनेक वेळा विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील चर्चा टोकाची होती. पण ही चर्चा संपल्यानंतर एकत्र बसून राज्याच्या हितासंबंधी विचार करत असत, ही महाराष्ट्राची परंपरा. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात अलिकडे नाही त्या गोष्टी बघायला मिळतात. मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण त्यांचं एकेरी नाव घेऊन त्यांच्यावर वेडंवाकडं बोलणं शोभत नाही. मुख्यमंत्री ही संस्था आहे, या संस्थेचा मान ठेवला पाहिजे."


'धार्मिक कार्यक्रम तुमच्या निवास्थानी करा'
राज्यात हनुमान चालीसावरुन सुरु असलेल्या वादावर पवार म्हणाले की, "धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या निवासस्थानी करु शकता. पण तो कार्यक्रम माझ्या दारात करतो म्हटल्यावर त्याबद्दलची अस्वस्थता माझ्याबद्दल आस्था असलेल्या सहकाऱ्यांमध्ये निर्माण झाली तर त्यांना दोष देता येणार नाही. येत्या काही दिवसात हे वातावरण शमेल अशी अपेक्षा आहे," असं पवार यांनी म्हटलं. 


'सत्ता येते-जाते, त्यात अस्वस्थ होण्याची गरज नाही'
शरद पवार यांनी यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. ते म्हणाले की, "सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. सगळेच माझ्यासारखे नसतात. 80 साली माझं सरकार बरखास्त झालं. ही बातमी मला रात्री साडेबारा वाजता मला मुख्य सचिवांनी सांगितलं. साडेबारा वाजता तीन चार मित्रांना बोलावलं आणि घरातलं सामान आवरलं. सकाळी सात वाजता मी दुसऱ्या जागी राहायला होता. त्या दिवशी क्रिकेटची मॅच होती, ती मी पाहायला गेलो. सत्ता येते जाते. त्यामुळे एवढं अस्वस्थ होण्याची गरज नाही. हल्ली काही जण फार अस्वस्थ आहेत. त्यांना मी दोष देत नाही. कारण निवडणुकीपूर्वी मी येणार, येणार घोषणा केल्या आणि ते घडू शकलं नाही. त्यामुळे अस्वस्थता आहे.


किरीट सोमय्यांना टोला
किरीट सोमय्या यांच्या दिल्ली दौऱ्यावरुनही शरद पवार यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, "अस्वस्थ असलेल्या लोकांनी कुठले कुठले मार्ग उपलब्ध आहेत, त्याच्या खोलात जाणार. त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. राष्ट्रपती राजवटीची दमदाटी केली जाते, त्याचे परिणाम होत नाही. निवडणुकीची वेळ आली तर त्याचे काय परिणाम होतात हे कोल्हापूरने सांगितलं आहे."