पुणे : पुण्यातील एका उद्योजकाला कच्चा माल विकण्याच्या बहाण्याने गुरुग्राम येथे बोलावण्यात आले. तेथे त्याचे अपहरण, तसेच मारहाण करुन लुटल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.


हरियाणा पोलिसांच्या मदतीने डेक्कन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. इम्रान उर्फ जेनेजर जानमोहंमद खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा मूळचा हरियाणामधला रहिवासी आहे. त्याच्या अजून चार ते पाच साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.

पुणे शहरातील तरुण उद्योजक योगेश देशमुख यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. आरोपींनी देशमुख यांना कच्चा माल खरेदीच्या बहाण्याने गुरुग्राम येथे बोलावले होते. देशमुख गुरुग्राम येथे गेले असता, त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांना पळवून नेण्यात आले. तेथे त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील फोन, पैसे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड काढून घेण्यात आले. त्यानंतर त्यांना तेथील हायवेवर सोडून आरोपींनी पळ काढला.

डेक्कन पोलिसानी एक तपास पथक गुरुग्राम येथे पाठवले. मोबाइल ट्रॅक करून गुरुग्राम पोलिसांच्या मदतीने आरोपीला गजाआड करूत पुण्यात आणण्यात आले आहे. आरोपीवर याआधीही गुन्हे असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. हे आरोपी मोठ्या उद्योजकांचे फोन नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क करतात आणि तिकडे नेऊन त्याला लुटले जाते. यामुळे अजून कोणाला यांनी अशा प्रकारे लुटले आहे याचा तपास डेक्कन पोलीस करत आहेत.