पुणे : सलामीवीर शिखर धवन आणि दिनेश कार्तिक यांच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वन डेत सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे तीन वनडे सामन्याच्या मालिकेत भारतानं 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

पुण्यातील वन डेत न्यूझीलंडनं भारतासमोर विजयासाठी 231 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताकडून धवन आणि दिनेश कार्तिकनं अर्धशतकं ठोकली. धवननं 83 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारासह 68 धावांची खेळी उभारली. तर दिनेश कार्तिकनंही नाबाद 64 धावांची संयमी खेळी केली.

दरम्यान, रोहित शर्मा या देखील सामन्यात अपयशी ठरला. तो अवघ्या 7 धावांवर बाद झाला. मुंबईतील सामन्यातही त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती.

तत्पूर्वी या सामन्यात सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करून न्यूझीलंडला 50 षटकांत नऊ बाद 230 धावांत रोखलं. भारताच्या भुवनेश्वर कुमारनं 45 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. जसप्रीत बुमरा आणि यजुवेंद्र चहलनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडनं वानखेडे स्टेडियमवर विजयी सलामी दिली होती. त्यामुळं पुण्यातील सामना जिंकणं भारतासाठी गरजेचा होता. मात्र, भारतीय संघानं ऐनवेळी न्यूझीलंडवर मात करत सामन्यात बरोबरी साधली. त्यामुळे आता कानपूरमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याकडेच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.