पुणे : पुणे महापालिकेमध्ये 23 गावांचा समावेश झाल्यामुळे पुणे महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरली आहे. 23 गावांच्या समावेशामुळे पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ हे 485 चौरस किलोमीटर इतकं झालं आहे. लोकसंख्येच्या बाबतीत मुंबई सर्वात मोठी महापालिका राहणार असली तरी आकाराने पुणे महापालिका सर्वात मोठी ठरली आहे. या गावांच्या समावेशामुळे पुण्याची हद्द चारही बाजूंनी वाढली आहे. त्याचबरोबर पुण्याच्या लोकसंख्येतही दहा ते बारा लाखांची भर पडणार आहे.

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्यातील प्रशासकीय अधिकारी आणि पुण्यातील काही आमदार यांच्या उपस्थितीत मंगळवारी (29 जून) मंत्रालायत एक बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यालगत असणाऱ्या 23 गावांचा समावेश महानगरपालिकेत करण्यात यावा यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या निर्णयानंतर पुणे महापालिका ही राज्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असणारी महापालिका ठरली आहे.

या गावांचा पुणे महापालिका हद्दीत समावेशमहालुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकिटवाडी, पिसोली, कोंढवा धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवळेवाडी, नंदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिरालेवाडी, गुजरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली या 23 गावांचा पुणे महापालिकेच्या हद्दी समावेश झाला आहे.

Continues below advertisement

पुणे महानगरपालिकेचा दरवर्षीचं बजेट अंदाजे आठ हजार कोटीच्या घरात असतं. इतकं प्रचंड बजेट असून देखील शहरातील मूलभूत सुविधा देखील पूर्ण होत नाहीत. रस्त्यासाठी, पाण्यासाठी इथल्या नागरिकांना दरवर्षी झगडावं लागतं. त्यात या 23 गावांचा पुणे महानगरपालिकेत नव्याने समावेश झाल्याने या नागरिकांना देखील मूलभूत सुविधा पुरवण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. 

पुणे महापालिकेची हद्दवाढ; 23 गावांचा पुणे महापालिकेत समावेश, भाजप- राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई

गावकऱ्यांचे प्रश्नतीन वर्षांपूर्वी 11 गावांचा महानगरपालिकेत समावेश करण्यात आला होता. तिथल्या नागरिकांना आतापर्यंत मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नाही. असं असताना या 23 गावातील नागरिकांचा विचार महापालिका प्रशासन खरंच करेल का असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. दुसरीकडे महानगरपालिकेत समावेश झाल्यास आनंदच आहे अशी भावना काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. परंतु महानगरपालिकेत गेल्यानंतर आम्हाला अधिकचा कर द्यावा लागेल. घरपट्टी, पाणीपट्टी भरावी लागेल. त्या प्रमाणात आम्हाला इतर सुविधा मिळतील का असा प्रश्नही ते विचारत आहेत.

गावांच्या समावेशावरुन भाजप-राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपया 23 गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यावरुन महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या गावांच्या समावेशासोबतच राज्य सरकारने या गावांच्या विकासासाठी दहा हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी भाजपने केली आहे. तर भाजप सरकारने त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ही गावं समाविष्ट न केल्याने त्यांच्या विकास आराखड्यासाठी लागणाऱ्या निधीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.