पुणे : केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं भीक मांगो आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर हे आंदोलन छेडण्यात आलं. शाळांनी मदतीसाठी कटोरा घेऊन सरकारकडं येऊ नये, त्याऐवजी माजी विद्यार्थ्यांकडे मदत मागावी असं वक्तव्य प्रकाश जावडेकर यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं.


जावडेकरांच्या या वक्तव्याविरोधारात आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. भीक मांगो आंदोलनाच्या वेळी जमा झालेली रक्कम जावडेकरांना पुण्यात आल्यावर देण्यात येणार आहे. तसेच जावडेकर पुण्यात येतील त्यावेळी त्यांच्या समोर हे भीक मांगो आंदोलन सुरूच राहील असा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे.


दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही प्रकाश जावडेकरांची फिरकी घेणारे फलक शहरात ठिकठिकाणी लावले आहेत.


काय म्हणाले होते जावडेकर?


शाळांनी भीकेचा कटोरा घेऊन नेहमी सरकारकडे येण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक सहाय्य मागावं, असं जावडेकर म्हणाले होते. जगभरातील अनेक शैक्षणिक संस्था कोण चालवतात? माजी विद्यार्थी. नामांकित विश्वविद्यापीठं कोणामुळे चालतात? माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीमुळेच. जे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत, त्यांनी आपापल्या शाळेला मदत केली आहे.


किंबहुना ही माजी विद्यार्थ्यांची जबाबदारीच आहे, असंही जावडेकर म्हणाले होते. शाळा नेहमी भीकेचा कटोरा घेऊन सरकारच्या दारात येतात. अरे, मदत तर तुमच्या घरातच पडलेली आहे. माजी विद्यार्थी तुमचं देणं लागतात, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.


संबंधित बातमी


शाळा भीकेचा कटोरा घेऊन सरकारकडे का येतात? : जावडेकर